गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

डॉ विद्या ठाकूर मॅडम


डॉ विद्या ठाकूर मॅडम 
****************

ठाकूर मॅडमला पाहिले की 
मला वटवृक्षाची आठवण येते 
वटवृक्ष छोट्याशा बीजातून निर्माण होऊन
उंच उंच आकाशात जातो 
परंतु आपली मुळ कधीच विसरत नाही 

तसेच तो आपल्या फांद्यातून 
नवीन आकार नवीनआधार
निर्माण करून विस्तारात जातो 
आपल्या जगासारखे शीतल उपकारक 
नवे जग  निर्माण करतो 
सभोवताल सुखावित जातो

या वृक्षाला ही ठाऊक नाही की
त्याने किती जणांना सावली दिली ते !
अगणित पशुपक्षी पांथस्थ इथे येतात 
निवारा घेतात श्रांत होतात अन्
नवीन उभारी नवे आश्वासन घेऊन पुढे जातात
 
सर्वांचे सदैव स्वागत हा त्यांचा रिवाज आहे 
सर्वांशी प्रेमाने वार्तालाप ही इथली पद्धत आहे.
इथे मने  जपली जातात 
मन ही परमेश्वराची विभूती आहे 
हे सांगायची गरज, इथे पडत नाही कधी 
प्रत्येक मनावर आणि माणसावर 
अकृत्रिम प्रेमाचा वर्षाव होत असतो इथे.
त्यांनी किती माणसे जोडली 
हे त्यांनाही ठाऊक नसेल 
जग म्हणते जगातील माणसे 
या जगावर इथल्या माणसावर 
त्यांनी उत्कट प्रेम केले 
प्रेम किती करावे हे आईला कळत नसते 
ते कमी आहे का जास्त हेही तिला माहीत नसते 
तसे त्यांचे आहे , 
त्या मातृत्वाची मूर्त स्वरूप आहेत

सौम्यत्च  हा काही चंद्राचाच गुण नाही
तो कधीही शीतलता सोडत नाही 
तशाच मॅडमही आहेत 
प्रसंगवशात कर्तव्य प्रणालीचा धबाड्यात 
कधी चिडल्या, तरीही त्यांचे रागावणे 
समोरच्यात कधीच धडकी भरवत नाही 
त्या रागावण्यात त्यांची सौम्यताच प्रकट होत असते
त्या रागवल्या नंतर लगेच शांत होतात 
आणि ती प्रेमाची किरणे पुन्हा एकदा 
त्यांच्या  मधून ओसंडून वाहू लागतात 
हे जणू गृहीतक आहे.
अर्थात काही लोकांना ते आवडत नाही 
त्यांना वाटते मॅडमनी कठोर व्हावे 
लोकांवर ओरडावे खडूस व्हावे
जास्त जवळ बसवू नये वगैरे वगैरे 
पण त्यांचे हे बोलणे म्हणजे 
सुगंधित गुलाबाला झेंडू  हो किंवा  
खळाळत्या  निर्झराला गावातला ओहळ हो 
असे म्हणण्यासारखे वाटते.

त्यांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 
त्या काळ जिंकणाऱ्या आहेत
त्या वेळ मुळीच जुमानत नाही
काळ आपल्यासाठी आहे 
आपण काळासाठी नाही ही ठाम समजून 
त्यांच्या कृतीतूनही दिसते
मग रात्री कितीही उशीर होऊ दे 
त्या काम संपूनच निघायच्या किंवा 
गाडीत काम घेऊन घरी घेऊन जायच्या 
म्हणणे मला असेही म्हणावेसे वाटते
वेळ जणू काही मैत्रीण आहे मॅडमची

त्यांची उत्सव प्रियता 
ही स्त्रीसुलभ तर आहेच 
पण त्यातून अधिक 
इतरांना आपल्या आनंदात 
सहभागी करून घेण्यात 
सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात 
ती साजरी होत असते ,व्यक्त होत असते
ते सारे म्हणजे
प्रेमाचा एक ऋजू धागा बांधणे 
किंवा मैत्रीची दृढ गाठ मारणे असते. 

त्यांची निरहंकारी वृत्ती अद्वितीय आहे 
सीएमो, एमएस, सीएचएमएस सारखी पदे, भूषवित असतानाही 
त्या पदाचा अहंकार ,दुराभिमान 
त्यांना कधीही शिवला नाही .
कुठलाच माणूस मित्र मैत्रीण 
त्यांच्यापासून तुटले नाही 
किंबहुना हे पद त्यांनी माणसे जोडण्यासाठी
कॅटलिस्ट म्हणून वापरले 

खरतर उच्च पदावर जाऊनही
आपले पाय सदोदित जमिनीवर 
असलेल्या व्यक्ती 
फार कमी असतात समाजात
पदाच्या आणि अधिकाराच्या 
अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले 
अनेक नवरदेव या महानगरपालिकेत आहेत
त्यामुळे या सर्वात ठाकूर मॅडमचे 
सौजन्यशील वागणे हे अतिशय वेगळे ठरते
त्यामुळेच 
समोरच्याला दुखावणे त्याला अज्ञापालन करण्यास भाग पडणे 
हे त्यांनी कधीच केले नाही 
त्यांचे सांगणे म्हणजे
बाळ  तू जेवशील ना ? जेव, अरे  ते छान आहे !
अशी प्रेमाची आग्रहाची सूचना असते.
काम सांगताना कामात बदल करताना.
त्या आज्ञे मधील सौजन्यता 
समोरच्या व्यक्तीचा योग्य तो आदर , 
त्याच्या अडचणी ऐकून घेण्याची तयारी 
आणि आज्ञेमध्ये बदल करायची लवचिकता 
त्यामुळे त्या सगळ्यांच्या परममित्र झाल्या.

त्यांच्या कारकीर्दीत 
"आत्ताच्या आत्ता चार वाजता cms ला या "
अशी फर्मान कधीच निघाली नाहीत.
त्या त्यांच्या प्रेमाच्या शक्तीने 
खूप कामे सहजच करून घेत होत्या.
म्हणूनच मला मॅडम म्हणजे 
माणुसकीने  बहरलेले 
आत्मीयतेने भरलेले झाड वाटतात 

मॅडमच्या हाताखाली काम करताना 
खडूस बॉस बरोबर काम करताना येणारा अनावश्यक आणि नकोसा ताण 
कधीच आला नाही 
त्यामुळे आमच्यापैकी सर्वांच्या
त्या फेवरेट बॉस आहेत आणि राहतील

त्या सौम्य शांतपणा मुळे 
काही संकटे ही ओढवून घेतली त्यांनी 
अन् ताणतणावही सहन केले 
पण तो संकटी पावणारा विघ्नराजेंद्र 
एकदंत गणप्ती
जो त्यांनी सदैव भजला 
तो त्यांच्या पाठीशी उभा होता 
त्याने दिलेली बुद्धीची स्थिरता, 
ती अथर्वता, ती शक्ति  
आणि माणुसकी सच्चाईचे कवच 
त्याचे सदैव रक्षण करीत होते 
यात शंका नाही

तो देव गजानन त्यांना 
उदंड आयुष्य उत्तम आरोग्य प्रदान करो 
आणि समाधान व आनंदाने भरलेले हे जहाज   
आपल्या दैवी गुणांचे निधान 
जगभर वाटत राहो हीच प्रार्थना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...