शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

प्राजक्त



प्राजक्त 
******
असंख्य मोतीया कळ्यांनी 
बहरून येते प्राजक्त राणी
अधीर वाट पहाटेची पाहत 
फुलण्याची आस ठेवत मनी

आतुरलेली प्रत्येक कळी 
स्पर्धा करत असते जिंकत 
आकाशातील चांदण्याशी
सर्वस्वाचे दान घेऊन हातात

खरखरीत पानांचे प्राक्तन
खुरटलेल्या जागेचे अंगण
साऱ्यांशी झुंजत आणि 
तरीही सारे काही स्वीकारत

असे नाही की फांदीवरून
दवाबिंदू नव्हते ओघळत
कुणी खेचलेल्या मोडलेल्या 
फांद्यांचे व्रण नव्हते दुखावत

पण हसणे फुलणे दरवळणे 
हा तिचा धर्म नव्हताच सुटत
आणि लोक त्या वाऱ्यावरती 
होती उगाचच संशय  घेत
 
सुगंध  कवेत घेण्यासाठी 
सदैव पिसा असतो वारा 
प्राजक्ताच्या अस्तित्वाला 
तोच अर्थ देत असतो खरा 

तरीही इथे जळतात कोणी 
जातात सौदर्या लाथडूनी 
काही पाने पडतात झरुनी
काही कळ्या जातात गळूनी

पण तिचे बहरणे थांबत नाही 
होणे गंधित वारा सोडत नाही
युगायुगांची ही असे कहानी
तरीही कुणाकुणा कळत नाही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...