डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (६ डिसे. 2023 )
***********************
त्यांनी डॉक्टर आंबेडकर वाचले नाहीत त्यांना डॉक्टर आंबेडकर कळलेही नाहीत
तरीही काहीही फरक पडत नाही
कारण त्यांना कळत आहे
त्यांची मोकळे आकाश आणि भरारता मुक्त वारा
आणि त्यांना हे माहित आहे की
या निळागर्द आकाशातला
त्यांचा देव बाबासाहेब आहे .
कारण या निळ्या आकाशाची देण
हे त्यांच्या कष्टाचे फळ आहे .
ते जातीभेदाचे कडवट रसायन
अजूनही उकळत आहे
मला हवे मलाही हवे मलाच हवे
कसेही करून हवे
जातीच्या कळपापासून हवे
वा धर्माच्या संघटनेतून हवे
हा हव्यास तेव्हाही होता आताही आहे
कदाचित हा हव्यास अमर आहे
वा हा हव्यास मनाचा मूळ गुणधर्म आहे
पण या हव्यासासाठी लावली जाते मानवता पणाला
ओढले जाते रस्त्यावर कोणाला
त्याचे सर्वस्व हिरावून
त्यांचे तनमन मानसन्मान मातीमोल करून
तेव्हा त्या कृत्याला अमानुषाहूनही अमानुष म्हणणे रास्त ठरते
परिस्थिती माणसाला श्रेष्ठ बनवते
किंवा लाचार बनवते जन्म नाही
हे गळी उतरवणे अशक्य असूनही
त्यांनी ते केले आणि मग आत्मग्लानीचे
मणा मणाचे हजारो वर्षाचे ते लोढणे
फेकून देता आले
हजारो लाखो करोडो पिचलेल्या लोकांना
त्यांच्या त्या अद्वितीय अवर्णनीय महन्मंगल पवित्रेक कार्याला शतकोटी प्रणाम !
त्यांच्यासाठी महामानव विश्वरत्न
या पदव्याही किती लहान वाटतात
कधीकधी वाटते ते जर असते तर
त्या माझ्या जगदबंधुला मी फक्त एकदा
कडकडून मिठी मारली असती
आणि शब्दावाचून माझी भावना व्यक्त केली असती .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा