मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

कारण नसतांना

कारण नसतांना
************
काही मासे राहतात 
चावत सोबतच्या माशांना 
कारण नसतांना
तसे काही माणसे राहतात टोचत 
सोबतच्या माणसांना 
या चावण्यात अन या टोचण्यात 
काय मजा असते 
कुणास ठाऊक . ?

वैराच्या अलीकडे अडकलेले
हे एक जगत वैर असतं का ?
किंवा हे भांडण असते
त्यांचें स्वतः शीच स्वतःचे
आणि चावता येत नाही स्वतःला 
म्हणून ते राहतात
भांडत चावत जगाला ?

अथवा निसरड्या वाटेवरून 
मुद्दाम चालायचे खाली पडायचे 
आणि जग हसले की 
त्या जगाला ओरडायचे
हा सारा खटाटोप का करायचा ?

वृत्ती प्रवृति आणि विकृती 
यांच्या धूसर सीमारेषावरती 
रेगाळणाऱ्या या व्यक्ती
कीव करावी त्यांची करुणेने दाटून 
का पाठवावे त्यांना दूर कुठे
अज्ञातवास लादून कळत नाही !

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फोटो

फोटो ***** क्षणभर वाटले ठेवावा तुझा तो फोटो  सेव्ह करून गॅलरीत  किंवा पाठवावा क्लाउड वर पहावा उगाचच कधी मधी तशीच दिसतेस तू अजून ...