सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

सार्थकता


सार्थकता 
********
साऱ्याच गोष्टी 
मनासारख्या होत नसतात 
म्हणून काय झालं ज्या होतात 
त्या काय कमी असतात .

भरून येते आकाश 
कृष्ण मेघ दाटतात
घनघोर धारा आसमंत व्यापतात
रस्ते अडतात मार्ग खुंटतात
त्या क्षणाचे त्या दिवसाचे 
सारेच कार्यक्रम उध्वस्त होतात
पण म्हणून काय झाले.
कारण तेव्हाच 
हिरवेगार वृक्ष तृप्त होतात 
सरिता ओसंडून वाहू लागतात
जीवनाचे हुंकार कणाकणात उमटतात

जीवनाचे गणित कधीही 
कुण्या एकट्या दुकट्यासाठी नसते 
चार-पाच तुकड्यासाठी नसते 
ते असते अवघा विश्वासाठी 
अपरंपार करूणेने भरलेले 
मुंगी पासून गरुडा पर्यंत 
अवघ्या सृष्टीला कवेत घेणारे 

म्हणूनच मनासारख्या न घडणाऱ्या 
गोष्टींचा बोळा करून 
टाकता आले पाहिजे त्यांना 
पूर्णतः विसरून
या विश्वाच्या पसाऱ्यात 
त्याचे निरर्थकत्त्व ध्यानात घेवून
अन् जगता आले पाहिजे 
समग्रतेशी एकरूप होवून 
यातच जीवनाची सार्थकता आहे.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...