शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

अभेट

अभेट
******
कधी कधी चुके भेट 
ज्याची हवी त्याची थेट 
आणि मग मनी उगा 
खंत राहे उमटत ॥

मैत्र खोल मनातले 
जिवलग होता होता 
राहतेच निसटत 
हातात या येता येता ॥

असतात साऱ्या गोष्टी 
काय सदा प्रारब्धात 
थोडे तरी घडो इथे 
ठरवले वास्तवात ॥

पौर्णिमेचा सोस कधी 
नव्हताच या मनात 
तारकांचा वेध डोळा 
लय होता आकाशात ॥

कधीतरी सरतील 
काळ मेघ दाटलेले 
अन पुन्हा गवसेल 
तेच सौख्य निळे निळे ॥

म्हण आशा मनातील 
म्हण स्वप्न डोळ्यातील 
संचितात कोरली मी 
गोष्ट एक उरातील ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...