मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

दत्त माझा


दत्त माझा
********

दत्त माझे गीत दत्त माझा मित
दत्त माझी प्रीत सर्वकाळ ॥१

दत्त आळंदीत दत्त पावसेत
दत्त नवनाथ  ठायी ठायी ॥२

दत्त स्वरूपात अवघी दैवत
मज दिसतात नटलेली ॥३

दत्त माझी भक्ती दत्त माझे ज्ञान 
कर्म आणि ध्यान दत्त झाला ॥४

प्रभाती जागृती  दिवसा दे स्थिती 
लय करी राती देव माझा ॥५

आता व्हावे लीन दत्त स्वरूपात
 लागलेली ओढ  सदोदीत ॥६

ऐसा दत्त ध्याता चैतन्यात चित्त 
झाले प्रकाशित अचानक ॥७

सुगंधी व्यापले  सारे आसमंत  
झाले रोमांचित तनमन ॥८

सगुण विरले निर्गुण मिटले 
शून्य ठाको आले घनदाट ॥९

भेटीविन भेटी दिली जगजेठी 
अंतरात दिठी वळलेली ॥१०

विक्रांत चरतो तीच रोजी रोटी 
अमृताची वाटी अंतरंगी ॥११

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...