शनिवार, २ एप्रिल, २०२२

परी


परी
*****

तुझ्या पैंजणाचे गाणं 
माझे आठवते मन
पाय इवले इवले
झिम्मा खेळती अजून ॥१

कुण्या राजाची तू लेक
फुल स्वर्गीय सुंदर
तुझे हलणे डोलणे
शब्दविना रुणझुण ॥२


तुझ्या रेशमी ओठात 
हसू येईल खळाळून 
नाद निष्पाप मोकळा
जग जाई भारावून ॥३

चित्र काढल्या रुपाची 
मूर्त सजीव देखणी 
आज दूर जरी किती 
रूप वसे माझ्या मनी ॥४

रहा सुखात तिथेही 
देतो आशिष येथून 
भेटी होणे नाही तरी 
जातो कितीदा भेटून ॥५


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

शुक्रवार, १ एप्रिल, २०२२

लाट


लाट
*****
प्रत्येक लाट पाण्याची 
असतेच मिटायची 
प्रत्येक उर्मी मनाची 
असतेच सुटायची ॥१

काय कधी कुणी इथे 
लाट आहे थोपवली 
जन्मभर कुणी कुठे
वाट पाहत थांबली  ॥२

खोटी नसे जरी तरी
हरवून जाते प्रीती
व्यवहारी जगण्यात 
उरतात रिक्त नाती ॥३

नाविन्याची ओढ जीवा 
सुखासाठी जीव झुरे 
मिटताच लाट उरे
सागराचे पाणी खारे ॥४

आली लाट येऊ द्यावी 
गेली लाट जाऊ द्यावी 
उगवून मिटे मन 
जाणीव ही स्पष्ट व्हावी॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

दृढ धरी

दृढ धरी
********
दृढ धरी मज
माझ्या ज्ञानदेवा 
चरणाशी द्यावा 
ठाव सदा ॥१

चपळ मन हे 
तुज असे ठाव
चालेना उपाव
माझा इथे ॥२

येते पुन्हा जाते 
दिशात हिंडते 
पथही चुकते 
परतीचा ॥३

गुरु महाराव 
तूच सांभाळता 
रडता पडता 
जगतात ॥४

धरतो चरण 
तुझे जन्मभर 
पडो न विसर 
कधी तुझा ॥५

सखा तू सोबती 
जन्माचा सांगाती 
विक्रांता या भेटी 
कधी देसी॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

एकांत


एकांत
*******

दिसे कल्लोळ भोवती
मज व्यर्थ जगण्याचा 
कधी भेटेल एकांत
अर्थ पूर्ण जीवनाचा.

कधी सुटेल कळेना
संग गर्द बळदांचा 
कधी होईल मी अंश
निराकार आकाशाचा

दिसे सदोदित जीव
याला त्याला बांधलेला
बंध हेच नाव काय 
असे इथे जगण्याला

हाती सोनियाची बेडी 
जरी सुंदर ती  किती
खणाखणा आदळते
माझ्या कानी पदोपदी 

आता भार होतो मना 
दुजेपणा दाटलेला
हाय परी देवे जीव
मज कळपाचा केला

पोटासाठी ओढियले
जीणे सारे कसेतरी 
सारे व्यर्थ होते जरी
मज कळे आता परी

गूढ जाणवतो मज 
एकांत तो मरणाचा 
नको हारतुरे वाटे
सन्मान या जगताचा 

इथे युद्ध द्वेष दु:ख
रक्त गंध या हवेला
वाटते मज इथे मी 
आलो उगाच जन्माला

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, ३० मार्च, २०२२

भग्न अर्धनरनारीश्वर


भग्न अर्धनरनारीश्वर
***************
एक एक गाठ कटुतेची 
मारत संसार चालतो 
जणू तुटता तुटत नाही 
म्हणून संसार चालतो 

तिला नको तेच कसे 
त्याला आवडत असते 
स्वातंत्र्याचे त्याचे संकेत 
तीही चुलीत घालत असते 

तिची बडबड अखंड अशी 
त्याला अगदी वीट येतो 
त्याची संथ बेपर्वा वृत्ती 
हिचा पारा चढत असतो 

स्पर्श सुखाचे क्षणिक सोहळे 
कधीच जळून गेले असतात 
अनाकलनीय असंतोषाचे 
ढग पुनःपुन्हा जमत असतात 

स्वप्नभंग असतो का हा 
अपेक्षांची वा माती होणे ?
कोंडमारा मनात दाटला 
त्याचे असे का उफाळणे ?

भरजरी सुखाला मग त्या 
अगणित भोके पडती 
दुरून सारे छान सुंदर 
जवळ कोणा ती येऊ न देती
 
पण का तुटत नाही दार 
का तुटत नाहीत भिंती 
एकच उत्तर याचे समाज 
लोकलाज जननिंदा भीती 

तसेच तिला हे माहीत असते 
बाहेर पशु आहेत किती ते
म्हणून कष्ट नि दुर्लक्ष साहत 
सुरक्षाच ती पसंत करते 

त्याला हवी असते भाकरी 
छप्पर एक दुनिया आपली 
जगामध्ये अन दाखवायला 
झुल सुखाची खोटी घेतली  

त्याला माहित तो नच शिव 
तिला माहित ती नच शक्ती 
घरोघरी तरी बळे नांदती 
भग्न अर्ध नरनारीश्वर ती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

आळंदीत

 

आळंदीत
********

चैतन्ये पिकला भक्तीने भारला 
वृक्ष हा थोरला आळंदीचा ॥
फांदी फांदीवर मोक्षाची वाहणी
कौतुक करणी माऊलीची ॥
उमटतो ठसा भक्त ह्रदयात 
ज्यांचे ह्रदगत  ज्ञानदेवी ॥
हरेक श्रांताला मिळतो विसावा 
सावलीत देवा तुझ्या इथे ॥
हवसे नवसे कितीक गवसे 
कोणी जात नसे रिक्त परी ॥
कळो वा न कळो घडते घडणे 
दिव्याने पेटणे दिव्यास त्या ॥
येऊन आळंदी विक्रांत हा धाला 
हृदयी ठेवला ज्ञानदेव ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

सोमवार, २८ मार्च, २०२२

दत्त रुजवतो

दत्त रुजवतो
**********

दत्त रुजवतो 
मनी माय मी 
दत्त रुजवतो ग  ॥ धृ॥

भजन पूजन 
ध्यान गायन 
रोज करतो ग 
दत्त रुजवतो ग ॥१

नापीक बरड
जरी जमीन ही 
रोज कसतो ग 
दत्त रुजवतो ग ॥२

 संत चरित्र 
 खत घालतो
 प्रेमे भरतो ग 
 दत्त रुजवतो ग ॥३
 
देह तापवून 
मन गुंतवून
तिफन धरतो ग 
दत्त रुजवतो ग ॥४

येईल पाऊस 
तया कृपेचा 
वाट पाहतो ग 
दत्त रुजवतो ग ॥५

विक्रांत मनी 
रोज गोड हे
स्वप्न सजवतो ग 
दत्त रुजवतो ग ॥६


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

आसावरी ताई श्रद्धांजली

रंग *** ( आसावरीताई काकडे ) रंग रेषा आणि शब्द  यात जीवा गुंतवूनी  एक निर्मळ आयुष्य  जगली ती मनस्विनी  खिडकीतील इवली तीच फुले आणि...