कवी सुनील जोशी एक आठवण
******************
या माणसाला
मी कधीच भेटलो नाही प्रत्यक्षात
तसे फोन कॉल झाले होते काही क्वचित
पण हा माणूस भेटायचा
त्याच्या कवितेतून नियमित
त्याचे प्रेम होते राधेवर कृष्णावर
तसेच भाषेवर आणि शब्दावर
अगदी शब्दातीत
कुठलाही शब्द प्रसंग चित्र मिळणे
हे जणू व्हायचे एक निमित्त
मग बसायच्या कविता
जणू की पाऊस
कधी रिमझिमत कधी कोसळत
पण का न माहीत
दुसऱ्याच्या कवितेवर
ते सहसा प्रतिक्रिया देत नसत
आपल्या कवितेत बुडून गेलेले
आपल्या रंगात वाहत असलेले
त्या स्व कवितेतून बाहेर पडायला
फुरसत नसलेले
आत्ममग्न शब्दमग्न व्यक्तिमत्व होते ते
कविता क्वचित कुणाची अमर होते
किंवा कालौघात थोडीफार टिकते
अर्थात कविता लिहिणाऱ्याला
त्याची मुळीच पर्वा न असते
तसाच सुनील जगला
त्या कवितेच्या विश्वात राहिला
सदैव शब्दरत साधनारत
मला वाटते हे असे जगणे
यातच कवी होण्याचे सार्थकत्व असते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .