सोमवार, २६ ऑगस्ट, २०१९

दत्त सावळा




दत्त सावळा  

********





दत्त सावळा सावळा

गौर कर्पूरी सजला

दत्त कैलाशी वैकुंठी

शैव वैष्णवी भरला



भेद भावाच्या सहित

देतो दिगंबरा मिठी

रूप रूपातीत तुझे

मज दिसू दे रे दिठी  



म्हणे एकांगी विक्रांत

गीत खेळात पडला

दत्ता चित्तात ठेवूनि

आत्म खेळात रंगला



© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

काफीरकी




काफीरकी

********

                     

कासया मी जाउ 
आता कुण्या दारी 
भार तुजवरी 
दत्तात्रया


होवो माझे भले 
होवो नच जरी 
जातो ना माघारी 
येथूनिया


तुझ्या दारी नाही 
असे जगी काही 
दिसत ते नाही 
मज दत्ता


जरी का उपाशी 
राहिलो मी इथे 
मिळणार कुठे 
काही नाही


सरली ही कथा 
माझ्या यातनांची 
आता कृपा तुझी 
खरी ठरो


अन्यथा होईल 
जगात नाचक्की 
व्यर्थ काफीरकी 
केली ऐसी


विक्रांत दारात 
तुझिया कुतरे 
तुकड्या लाचारे
दीन उभे
.                         

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

ओठावरी गाणे होते




ओठावरी 
गाणे होते
गाण्यामध्ये
शब्द ओले

ओळीमध्ये

शब्द खुळे
अर्थ खोल
काही रूळे

प्राण होते 

भारलेले
देहावरी 
उमलले

स्पर्श तुझे 

हळूवार
किरणांनी
माळलेले

फुल गाली 

उमलले
मीन डोळे
काजळले

नेत्र निल 

हरवले 
शुभ्रकांती 
विसावले 

आभाळ ही

निळे निळे
माझ्यामध्ये
आकारले

जगण्याचा 

भाषा ल्याले 
क्षण होते
सजलेले

काय एथ

मी असे वा 
परकाया 
कुणी आले

हरवला 

आकार हा 
आधारही 
नवे आले 

तिच वाट 

तिच गाठ 
देही दीप 
पाजळले



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in‍

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

कृष्ण आला दारी



कृष्ण आला
*********

पहाटेच्या पारी
कृष्ण आला दारी
सखा आला घरी
केली त्यानी चोरी ॥

निजलेले होते
स्वप्न सजलेले
चोरीयले भान
ध्यानी भरियले॥

घरदार नेले
नेली पोर बाळी
नवरा नणंद
नेली एक सरी ॥

लुटले गं बाई
आले रस्त्यावर
सावळ्या भ्रमात
झाले वेडी पार ॥

एकुलीच आता
एकुल्या मनात
एकुलिये जग
एकुल्या पणात ॥

गवळण मनी
काठोकाठ कृष्ण
विक्रांत भरून
सुखावला


.

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in‍

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

नापास हे घोडे


 नापास हे घोडे
*************
जर तुला वाटे
नापास हे घोडे
मोजुनियां कोडे
देई दत्ता ॥

प्रियकर हाती
घडावे शासन
करीन प्राशन
विष तेही ॥

तेणे गुणे काही
पडे तुझी गाठ
ऐसी मज भेट
कृपा करी ॥

करी रे दानव
कंस वा रावण
हाताने मरण
देई मज ॥

देई रे पशुत्व
देई रे दास्यत्व
दिसु दे देवत्व
तुझे मज ॥

मग हा विक्रांत
जन्म जन्मांतरी
राही पदावरी
तुझ्या दत्ता
००

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

पिंजरा





पिंजरा
*****

विश्व पिंजऱ्यात
कोंडीयले  मला
देऊन खायाला 
गोड फळे 

सुख सौख्य देहा
दिला मानपान
व्यर्थ अभिमान
वाढविला

सुटू गेली चिंता
आजची उद्याची
गोळीच निजेची
घेतली म्या

सुटले भाविक
जीवलग संघ
भोगाचे अभंग
पाठ झाले 

विक्रांत सुटावा
यया कारेतून 
पंखी पांघरून
बळ तुझे

प्रभू दत्तात्रेया
तुच बाप माझा
तोड दरवाजा
आसक्तीचा

मग मी उडेल
गगन होईल
मजला भेटेल
माझेपणी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

००

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

इथे मरण साजिरे



मोह मधुर मदिर
कुण्या डोळ्यात शिरला
जीव बुडाला हरला
शब्द सुगंधीत झाला

आले सावज हातात
रानी आरोळ्या उठल्या
दाट हिरव्या झाडीत
कुणी जिभल्या चाटल्या

कोण मरून जगले
काय ठाव या जगाला
देशोधडीला लागून
कुणी भेटले कुणाला

डोह डोळ्यांचा गहिरा
कुण्या जीवास कळतो
जन्म सांडून पतंग
कैसा आगीला भिडतो

जा रे  जा रे  वाटसरा
इथे नकोच रेंगाळू
इथे मरण साजिरे
कोणा क्वचित ये कळू

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...