वाट
*****
दिशाहीन अशी
होऊनिया पिशी
मुक्कामाच्या ॥
सारे सुख जरी
बाजू घुटमळे
सुमनांचे मळे
सजलेले ॥
वाटेला वाटेचे
वाटपण टोचे
कणोकणी काचे
अस्तित्वाच्या ॥
वाटेवीन वाट
काय ती होवावी
मुक्कामास जावी
सोडुनिया
पाऊलांची नाती
चाकोरीची गती
उठती धावती
युगे युगे ॥
प्रत्येक पाऊली
असे सुरुवात
आणिक तो अंत
तेव्हाच ना ॥
ऐसा उमजेचा
दगड मैलाचा
सद्गुरु तियेचा
सांगी होय ॥
तिजला कळले
तिचे ते नसणे
भूमी रेखाटने
काल पदी ॥
जाणून तियेचे
थांबणे धावणे
मैलाचे बोलणे
बोलावीन ॥
विक्रांत तटस्थ
जाहला क्षणस्थ
पथ आकाशात
हरवला ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा