सोमवार, १७ जानेवारी, २०२२

चहा टँनिन अन न्युरॉन


चहा टँनिन अन न्युरॉन
************

कडवट गोड काळा चहाही 
मी आवडीने पितो
उतरतांना घशातून तो 
काना डोळ्यालाही कळतो

अन जो असतो केवळ 
दुधाचाच स्पेशल असा तो
कितीतरी वेळ जीभेवर 
उगाचच रेंगाळत राहतो 

हि दोन्हीहि विरुद्ध रूपे
एकाच चहाची असतात 
पण न्युरॉनला परफेक्ट 
असे टँनिन पोचवतात

न्यूरॉन्स ला कुठे कळतो 
रंग गंध त्या चहाचा 
त्याला फक्त हवा असतो 
डोस रोजच्या मात्रेचा 

सुखही तशीच अन 
दुःख तशीच असतात 
त्या आपल्या अहंकाराला 
छान फुलवत बसतात 

सुख ही त्यालाच 
दृढ करत असते
दु:ख ही त्यालाच 
खोलवर रुजवते

हे खरं आहे की गोडी 
हरवते पटकन इथं 
पण कडवटपण राहते
खूप वेळ  रेंगाळत 

बाकी त्यात काहीही टाका 
प्रेम भरा हवे तसे हवे ते 
ग्रीन करा लेमन करा 
मध गूळ काय मिळेल ते 

पण टँनिन मिळाले नाही 
तर सारेच अर्थहीन होते
कारण हेच  केवळ त्या 
चहाचे प्रयोजन असते

रोज सकाळी 
म्हणूनच की काय 
शंकर महाराजांना मी 
अर्पण करतो ती चाय 

म्हणतो घ्या हा प्याला 
घ्या हे टँनिनच व्यसन 
जे सुख दु:खातून 
आले दाटून 
मला मुक्त करा यातून .

पण चहा मला आवडतो 
तो खेचून नेतो
अन बुडवून टाकतो 
कुठल्या एका कपात

तपकीरी काळ्या 
गडद डोहात
जणू कुणाच्या डोळ्यात 
चकाकत्या विभ्रमात

चहाचा तो कप राहतो
सदैव आवतन देत
मला अधीर करत

अन ते सारे न्युरॉन 
असतात हसत
आपल्या कोषिकात 
मला
माझ्याही नकळत.
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...