शनिवार, २९ जानेवारी, २०२२

चंद्र शोध


चंद्र शोध 
*********

पथ सारे सुटलेले
नुरे पावुलांच्या खुणा 
ओढ कसली कुणाची
मागे खेचते जीवना ॥१

कधी सांडले सुखाचे 
मीच नावडून घट 
कुण्या स्वप्नाची तरीही
मन पाहतसे वाट ॥२

जरी जाणतो विभ्रम 
इंद्रधनुचे नभात 
हाव डोळ्यात जागते
तया घेण्यास कवेत.॥३

पट तुटले दिशांचे
धुके विरळ संदिग्ध
हात सुटती धरले
स्पर्श परके विदग्ध ॥४

काही मागताच कुणा 
चोरी वाटते जगाला
फुले वेचता पडली 
सजा करती जीवाला ॥५

कोण खेळणार कसा 
डाव मोडलेला असा 
दत्त दूर डोंगरात 
नच ओळखत जसा ॥६

हाय विक्रांत अजून 
भिरभिरतो नभात 
नाही दोर अन दिशा 
चंद्र शोधतो मनात ॥७

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बाजार

दत्ता . **** कसे आळवू तुला मी या संसार कबाड्यात  कसे शोधू तुला मी या रोजच्या बाजारात । इथले हिशोब तेच जुनाट  चालतात दिनरात तीच ब...