गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

सावळ्याची सखी

सावळ्याची सखी
**************

सावळ्याची सखी 
असे तू सावळी 
घन ओघळली 
रेशमी सावली 

घनगर्द बटा 
आकाश वादळी 
चिंब निरागस 
जलभार डोळी 

शब्द किती तव
अडलेले ओठी 
आणिक गुपिते 
दडलेली पोटी 

कोणास सांगावे 
तुज न कळते 
आकाश दाटले 
शिखर शोधते 

नकोच शोधूस
तो मुग्ध सावळा 
बघता अंतरी
दिसेल तुजला 

शब्दातील अर्थ
शब्दात राहू दे
मौनातच बोल
तव मावळू दे
 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...