शनिवार, २९ मार्च, २०२५

द्वैत

द्वैत  
*****
चंद्र चांदणे तुझेच होते 
सुरेल गाणे तुझेच होते 
मंत्रमुग्ध मी नयनी तुझ्या 
असणे सारे तुझेच होते ॥

वारा किंचित असल्यागत 
स्पर्श गंधित तुझेच होते 
वेड्यागत मी अर्ध्या धुंदीत 
भान परी रे तुझेच होते ॥

देह कुठला मन कुठले 
रूप केवळ तुझेच होते 
कोण कुणात भिनले होते 
नाटक ते ही तुझेच होते ॥

स्थळ काळाचे अर्थ सरले 
क्षण स्वाधीन तुझेच होते 
होत प्रीत मी माझी नुरले 
द्वैत ठेवणे तुझेच होते ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

डॉ उज्वला उजगरे (निवृत्ती निमित्त)

डॉ. उज्वला (निवृत्ती निमित्त)
**************
डॉक्टर हा रुग्णाच्या आरोग्यासाठी असतो 
रुग्णाच्या मनोरंजनासाठी नसतो 
हे सूत्र मी डॉक्टर उज्वला कडून शिकलो 
आणि या डॉक्टरकीच्या अधिक्षेत्रात 
साम्राज्यात कोणालाही कधीही 
घुसू न देणाऱ्या 
मोजक्या वैद्यकीय अधिकाऱ्या मध्ये 
डॉक्टर उज्वला उजगरे आहे

कोणीही जाता जाता कधीही उठून .
कॅज्युटीमध्ये यावे 
आणि स्वतःची खातेदारी करून घ्यावी
 हे उज्वलाने कधीच सहन केले नाही .
एका अर्थाने कॅज्युल्टीचे पावित्र्य महत्व 
तिने परफेक्ट सांभाळले होते
तिची मते ठाम असल्याने 
बोल्ड व बिनधास्त स्वभाव असल्याने 
तिच्याशी एकदा वाद घातलल्या माणूस 
पुन्हा त्यांच्यासमोर उभा राहणं अशक्यच .
खरंतर मलाही असेच तिच्यासारखे वागावें 
असे वाटायचे पण ते जमायचे नाही
.
बाकी ती व्यवहारदक्ष आहे 
कामात प्रामाणिक आहे कुटुंब वत्सल आहे 
जगण्याच्या आनंद घेणारी जीवन रसिक आहे 
मुळात नोकरी आपल्यासाठी आहे 
आपण नोकरीसाठी नाही 
हा स्पष्ट दृष्टिकोन तिच्या वर्तनात आहे 
आणि तो योग्यच आहे .
नोकरीचे सात आठ तास 
पूर्णतः प्रामाणिक काम करणे .
हे दिवसेंदिवस दुर्मिळ होणारी चित्र 
पण उज्वलाने मात्र त्यात 
कधीही कुचराई केली नाही 
तिच्या स्ट्रेट फॉरवर्ड स्वभावामुळे
 तिच्याबरोबर ड्युटी करताना 
कधी कधी टेन्शन यायचे 
तरीही तिच्याबरोबर ड्युटी करताना 
एक छान सोबत असल्याचा आनंद मिळायचा 
त्याच्या कारण तिच्या स्वभावात 
एक ट्रान्सपरन्सी एक निर्मळपणा आहे 
तिचे व्यक्तिमत्व सांगत असते 
"मी जशी आहे तशी आहे 
मी  माझ्या तत्त्वावर जगणारी वागणारी
तुम्ही मित्र म्हणून जवळ आला तर स्वागत आहे 
आणि दूर गेला तरी हरकत नाही "

ती कोणासाठी अडून बसलेली नाही 
कुणासाठी रडत थांबली नाही 
खरंच हा एक विलक्षण अनासक्त योगच आहे
मला असं वाटतं तिचं जीवन ती
स्व सामर्थ्य स्वयम् निर्णय आणि स्व दिशा 
या त्रिसूत्रीवर जगत होती, जगत आहे 
आणि जगत राहील 
तिच्या उर्वरित आयुष्यासाठी तला खूप खूप शुभेच्छा निरोगी रहा आनंदी राहा.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

हेड क्लार्क देशपांडें बाई (निवृत्ती निमित्त)

हेड क्लार्क देशपांडें बाई (निवृत्ती निमित्त)
******************
ज्यांना ज्योतिष्य शास्त्र थोडेफार माहित आहे त्यांना ठाऊकच असेल 
जश्या माणसाच्या पत्रिका असतात 
तश्याच देशाच्या गावाच्या इमारतीच्या 
आणि ऑफिसच्या सुद्धा पत्रिका असतात .
तर आपल्या या अगरवाल रुग्णालयाची 
एक पत्रिका आहे .
जिला एक साडेसाती चालू होती  
जी सहजासहजी संपत नव्हती
दाखवून अनेक नैवेद्य करून आरती 
आणि हतबल झाला होता
इथल्या पत्रिकेचा स्वामी .
अशावेळी यावा गुरु स्वस्थानी 
आणि सुधाकर रुपी चंद्राशी
त्याची व्हावी सुयोग्य युती 
मग साडेसातीचे परिणाम जावेत पूसून
तसे झाले देशपांडे बाई 
तुम्ही या ऑफिसमध्ये आल्यानंतर.
इथे काम करण्यापेक्षा काम करून घेणे 
फारच अवघड असते 
धूमकेतू गत वरून आलेली फर्मान
रिपोर्टची तातडी प्रश्र्नांची  सरबत्ती 
त्यांना उत्तरे देणे मोठी कसरतच असते 
.
 तुम्ही प्रामाणिक प्रयत्नाने सदविवेकबुद्धीने
आणि विघ्नहर्ताच्या कृपेने निभावले सारे
 जिंकलात अनेक लढाया 
केल्या अनेक वाटाघाटी तडीस नेले तह
नाठाळ आरेरावी उद्दाम सुभेदारां सोबत

खरंतर तो तुमचा पिंड नाही 
तरीही प्रत्येक अडचणीला सामोरे जात 
तुम्ही होता मार्ग काढत 
कुठे कुठे चकरा मारत 
कुणाकुणाला भेटत 
आपल्या पदाची स्वप्रतिष्ठेची पर्वा न करता 
तसे मी पाहिले तुम्हाला 
कधी कधी वैतागलेले शीणलेले 
आणि शून्यात हरवलेले 
पण प्रत्येक वेळी तुम्ही बाहेर पडला त्यातून 
फिनिक्स पक्षाप्रमाणे 
त्याच प्रामाणिक सदिच्छे सह 
कर्तव्याच्या जाणीवेसह 
भिडलात आपल्या कामाला 
मुन्सीपालटीत राहूनही 
मुन्सीपलाईज न होता काम करणे
खरंतर  एक तपश्चर्याच असते 
ती तुम्ही उत्तमरीत्या पार पाडलीत
.
माझ्यासोबत तुम्हीही होता 
मोजत निवृत्तीचे वर्ष महिने दिवस 
आणि ते साहजिकच होते 
तो दिवस आहे आज उजाडत 
डोक्यावरचा भार आहे उतरत 
आता उठणे पळणे लोकल पकडणे 
रिक्षा शोधणे याला आराम आहे
फाईल शोधणे रिपोर्ट उत्तर देणे 
याला विराम आहे 

पण एक फेरी प्रभादेवीची 
ती मात्र तशीच चालू राहील 
याची मला खात्री आहे 
तुम्हाला  उत्तमआरोग्य आणि
दीर्घआयुष्य लाभो 
हीच बाप्पाकडे प्रार्थना !
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, २६ मार्च, २०२५

सुटू नये

सुटू नये
******
सुटू नये देवा कधी तुझे नाव 
जगाचा हवाव सुटू दे रे ॥

इथे जे मिळते सदा हरवते 
उरात टोचते सर्वकाळ ॥

करावी ती होते व्यर्थ उठाठेव 
सुखाचा अभाव असलेली ॥

येतो जातो वारा झरे पावसाळा 
स्थिर त्या अचळा क्षिती नाही ॥

तैसे सुख दुःखी कर माझे मन 
तुझिया वाचून अन्य नको ॥

विक्रांत जगता बहु कंटाळला 
येऊन बसला दारी तुझ्या ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २५ मार्च, २०२५

बधिरता

बधिरता
****
कळत नाही विषण्णता मरणाची 
कशी विसरतो माणूस  
लगेचच
बाहेर पडता पडता
फाटकातून स्मशान भुमीच्या

सुरु होतात त्याच वार्ता नेहमीच्या
घरादाराच्या ऑफिसच्या  
पार्टीच्या पिकनिकच्या 
तर कुणी विचारतो एकमेकांना
जागा बसायच्या 
त्या गेलेल्या व्यक्ती प्रति
आदर असूनही 
ही अशी अवतरणारी 
हि उदासीन बधीरता
खरी आहे की खोटी आहे 
मला कधीच कळले नाही

हि स्थितप्रज्ञता नाही हे तर निश्र्चित कळते 
तर मग काय कारण मीमांसा असावी याची

कदाचित अज्ञाताचा दारावर 
डोके आपटून आलेली 
उद्दिग्न कठीणता
वा भोगात लोभात विखुरलेली 
बहिर्गामी मानसिकता .
का एक व्यवहारीक 
सामाजिक इतिकर्तव्यता 

खर तर ते  आपले 
शेवटचे प्रस्थान स्थळ पाहून 
व्हावे अंतर्मुख पुन: पुन्हा 
अर्थ जीवनाचा शोधावा पुन्हा 
ही क्रिया घडून येते आपसूक 
कुणी त्याला म्हणतात 
स्मशान वैराग्यही 
जे टिकते 
काही तास दिवस ही
पण  जर ते आले नाही तर
संवेदनशीलताच्या अध:पतनाचा
गंभीर प्रश्न उभा राहतो .
या समाजापुढे माणसापुढे 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


सोमवार, २४ मार्च, २०२५

स्पर्श

स्पर्श
****
एक शब्द प्रिय मधु ओठातला 
गवतावरती दवबिंदू झाला 
जीवनाचे गाणे अर्थ भरलेला 
साऱ्या माळराना स्वप्न देत गेला ॥

एक स्पर्श मृदू निळ्या पावलाचा 
पाऊलवाटेला स्वर्ग भास झाला 
एक नवेपणा पुन्हा ये मातीला 
खोल कातळाला पाझर फुटला ॥

एक सूर भिडे दूर आकाशाला 
गजबजे उर धुंदी कल्लोळाला 
कुठले हे तप आले रे फळाला 
आनंद भेटला जणू उधानाला ॥

गंध चंदनाचा केशर भिनला 
दाही दिशातून कोंदून भरला
स्वप्न गोकुळाचे पडे मथुरेला 
व्याकुळ दिठीत प्राण आसावला ॥

अंतरी कुठल्या स्मरणाची माला 
पट जणू काही मनी उघडला 
पाहता पाहता पाणी आले डोळा 
मंद परिमळ वेढून राहिला ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

श्रद्धा

श्रद्धा
****
मुक्काम तर नक्की येईल 
चालणे थांबू नये कधीच 
पाय दुखतील खूपतील 
रडणे घडू नये कधीच ॥१
वाटा नागमोडी वळणाच्या 
वाटा उंच चढउताराच्या 
होईल त्रास चालण्याचा 
चिडणे घडू नये कधीच ॥२
भेटतील साधू सज्जनही 
भेटतील खट लुटेरे ही
देतील कुणी वा सर्वस्वही
बंधन घडू नये कधीच ॥३
मंत्र सदोदित चालण्याचा 
तुझ्या अन् माझ्या जीवनाचा 
माय शिकवते पुन्हा पुन्हा 
अरे विसरू नये कधीच ॥४
संकटे येथील अचानक 
घटना घडतील थरारक 
दृढ विश्वास परी तो एक 
श्रद्धा सुटू नये कधीच ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २२ मार्च, २०२५

दरवळ उपक्रमासाठी

दरवळ (उपक्रमासाठी )
******************
तो दरवळ तुझ्या स्मृतीचा 
असतो वाहत माझ्या सभोवत 
तुझ्या सहवासातील ते इवले क्षण 
राहतात माझ्या मनी झंकारत 

आता तर तू हाकेच्या पलीकडे 
करून बंदिस्त स्वतःला दुसऱ्या जगात 
आणि माझे असणे जगरहाटी 
चाललेय त्याच त्याच आवर्तनात 

भेटशील तू कधी वा न भेटशील 
धरणात तुझ्या तू बंद  राहशील 
पण हा दरवळ पूरे आहे मला 
माझी उरलेली वाट चालायला 

तो पाऊस तेव्हा कोसळलेला 
तो वसंत तेव्हा फुललेला 
वसतो आहे माझ्या रंध्रा रंध्रात 
अन् मी आहे त्यांना धन्यवाद देत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २१ मार्च, २०२५

शिकार

शिकार
*****
शब्द चांदण्याचे 
भूल पाडतात 
नेती आडरानी 
चकवा मनात १

स्पर्श पालवीचे 
सुख वर्षतात 
भोवरे होवून 
वाहुन नेतात २

डोळे तडितीचे 
खोल घुसतात 
आप्त तोडोनिया 
वेदना देतात ३

स्मित सुमनाचे 
वाट मोडतात 
वणवा जीवना 
आग लावतात ४

अगा अवघे हे 
पारधीचे गाणे 
भुलता हरीण 
प्राण पडे देणे ५

दिसे दूरवर 
अमृताचे तळे 
धाव धावूनिया 
मृगजळ मिळे६

असे हा जिहाद
खुळ्या प्रेमासाठी 
बाण  मखमली 
शिकार शेवटी  ७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २० मार्च, २०२५

शल्य

शल्य
****
पुन्हा पुन्हा तुझे गाणे मनात या उमटते
त्याचं शब्दी त्याच वृत्ती पुन:पुन्हा जन्म घेते ॥ 

पुन्हा पुन्हा तीच वाट मज नागमोडी दिसे 
तीच तुझी पडछाया तेच येणे पुन्हा भासे ॥

तुझ्याविना जीवन हे चाले नीट नेटकेसे 
घरदार संसार हा सारे काही ठीक असे ॥

माळेतील मणी जणू ओवलेले एकसरी
हरवला कोणी जरी नवा तया जागेवरी ॥

परी दोर जाणतोच कोण कुठे निसटले 
मौन त्याची गाठ घट्ट शल्य असे झाकलेले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

बुधवार, १९ मार्च, २०२५

हट्ट

हट्ट
****
एक हट्ट माझा पुरवी दयाळा 
माळ तुझी गळा पडो माझ्या ॥

एक स्वप्न माझे येऊ देत फळा 
पाहू दे रे डोळा रूप तुझे ॥

एक अर्थ माझ्या देई रे जीवना 
पायीच्या वाहणा करी मला ॥

अगा ज्ञानदेवा जीवीच्या जिव्हारा 
पावुलाशी थारा देई मला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

मंगळवार, १८ मार्च, २०२५

आळंदीत

आळंदीत
********
चालला गजर राम कृष्ण हरी 
 नाद नभावरी दुमदूमे ॥

 वाहे खळखळ इंद्रायणी जळ 
जाय मनोमळ वाहूनिया ॥

वैष्णवांची दाटी लाट लाटेवरी
पुण्य भूमीवरी पुण्यमूर्ती ॥

जया जैसा भाव तया तैसे फळ
माऊली दयाळ देत असे ॥

भारलेले क्षण दिव्य कणकण 
गेलो हरखून पाहुनिया ॥

विक्रांता जाहले जड देह ओझे 
चित्त चैतन्याचे साज ल्याले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

सोमवार, १७ मार्च, २०२५

सावल्या

सावल्या
****
जरी जीव खुळा उतावीळ होता 
कुणासाठी तरी टाळल्या मी वाटा 

कुणासवे तरी थांबलो बोलता 
मनात असंख्य असून कविता 

कुणा सवें झालो तटस्थ उदास 
कोरडी करून डोळ्यातील आस 

असेल कुठल्या जन्माचे हे देणे 
अथवा पुढे हे ऋण मी फेडणे

किती सोडवल्या बसलेल्या गाठी 
 नच येवू दिले नाव ते ही ओठी

परी कानी येती कुठले हे सूर 
विराण एकांती उरी का काहूर 

सुटूनिया गेले गाव दूरवर
तरी खुणावती वाटा का धूसर

हालती सावल्या मनात दडल्या 
चाहुली वाचून भोवती दाटल्या

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

रविवार, १६ मार्च, २०२५

ज्ञानदेवा - प्रार्थना


ज्ञानदेवा - प्रार्थना
***************
उगमाला ओढ सदा सागराची 
तशी ह्या जीवाची दशा होय॥१

नुरो माझेपण उरो तुझेपण 
घडो समर्पण ऐसे काही ॥२

सरो माझी वाट तुझ्या आळंदीत 
वळणे परत घडू नये ॥३

सरो माझे श्वास तुझ्या गाभाऱ्यात 
देह निर्माल्यात जमा व्हावा ॥४

अस्तित्व कापूर पेटो धडाडून 
नुरावे निशाण इवलेही ॥५

इतुकी प्रार्थना माझी ज्ञानदेवा 
तुझाच मी व्हावा माझेविना ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

शनिवार, १५ मार्च, २०२५

रंग

रंग
***"
उधळलेस रंग किती 
रंगीत झाले जीवन 
सरुनही सण सारे 
उतरती न अजून ॥

रंग तुझ्या डोळ्याचे 
रंग तुझ्या स्पर्शाने 
रंग तुझ्या लोभाचे
रंग तुझ्या रागाचे ॥

जीवनाची सारी पाने 
गेली रंगीत होऊन 
उलटून पाहताना 
गमती ताजी अजून ॥

तुझ्यामुळे मजलागी 
रंग जीवनाचा कळे 
प्रेम विरह ओढीचे 
इंद्रधनु मनी झुले ॥

उधळले काय किती 
मी मज नच स्मरते 
हासू तुझ्या डोळ्यातले 
कृतार्थ मज करते ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

गुरुवार, १३ मार्च, २०२५

येणे जाणे

येणे जाणे
*******
माझे असणे तुझ्या मधले
कळल्याविना मजला कळले ॥१

असो थांबले असो वाहिले 
वारे नभात सदैव भरले ॥२

ऋतु ऋतूत रंग वेगळे 
तप्त कधी वा थंड गोठले ॥३

कधी धुरात धुक्यात भरले 
आकाश परि ना कधी मळले ॥४

तुझ्याविना न काही इथले
असणे नसणे माझे कुठले ॥५

देणे तू तर होऊन गिळले 
घेणे मग मज नाही उरले ॥६

तुझा असे मी सदैव तुझा रे 
येणेजाणे हे कधी न जाहले ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १२ मार्च, २०२५

माय

 
माय
****
अजात पाखरावर 
आपल्या पंखाची 
पाखर घालणारी 
माय कधी मरू नये 
प्रेमाने सौख्याने मायेने  
घर सांभाळणारे
आधार कधी मोडू नये 
या तुझ्या जगात देवा 
सुख भरपूर आहे 
घे सारे परत हवे तर पण 
बाल्य कुणाचे करपू नये 
होय मला मान्य आहे 
तुलाही मर्यादा आहेत 
जन्म मरणाचे नियम तुझे  
सारेच निष्ठूर आहेत
पण तिच्याशिवाय सांग 
आम्ही तुला कुणात पाहू रे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

सोमवार, १० मार्च, २०२५

डॉ उषा म्होप्रेकर मॅडम (श्रद्धांजली )



डॉ उषा म्होप्रेकर मॅडम माझी प्रिय बॉस  (श्रद्धांजली )
************************
चंद्राची शीतलता आणि सूर्याची तप्तता  
धारण केलेले व्यक्तिमत्व होते 
म्होप्रेकर मॅडमचे 
ती शीतलता प्रियजनावर ओसंडणारी 
अविरत निरपेक्ष आणि भरभरून 
जी अनुभवली आहे आम्ही सर्वांनी
आणि ती तप्तता जी नव्हती कधीच 
जाळणारी पोळणारी छळणारी 
परंतु होती सुवर्णतप्त 
कर्तव्यनिष्ठतेच्या पदाच्या अधिकाराच्या सन्मानातून आलेली

प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून 
एम टी  अगरवाल हॉस्पिटलमध्ये 
त्यांनी केलेले काम 
होते अतिशय प्रामाणिक 
स्वच्छ आणि पारदर्शक  
कोणाच्या एका रुपयाचे मिंधेपण नसलेले
स्वच्छ निष्कलंक जीवनाचा त्या आदर्श होत्या 

प्रमुख वैद्यकीय अधिकारी या पदाचा 
त्रास त्यांनी तेवढ्याच सामर्थपणे पेलला 
जेवढा त्या पदाचा आनंद त्यांनी घेतला
मित्र आप्तेष्टा सोबत अतिशय मनमोकळेपणा
 प्रामाणिक लोकांबद्दल प्रचंड आस्था 
 ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये होती

काही लोक त्यांना खरोखर
मनापासून आवडायचे नाहीत 
परंतु त्यांना दूर ठेवूनही 
त्यांच्याबद्दल कुठलीही सूड बुद्धी आकस 
न ठेवता  वागल्या त्या.

एक अतिशय उदार मित्रप्रिय 
स्वाभिमानी करारी निष्कलंक 
निर्भय प्रामाणिक व्यक्तिमत्व 
आज आपल्याला सोडून गेले आहे . 
अशा व्यक्तींचे जाणें हे मित्रांसाठी 
आप्तांसाठी  फार मोठे नुकसान असते 
पण समाजासाठी एक हानी असते
या माझ्या प्रिय बॉसला आदरांजली .
परमेश्वर त्यांना सद्गती देवो हीच प्रार्थना .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

रविवार, ९ मार्च, २०२५

वेध

वेध
****
क्षणात एका नसतो आपण 
जेव्हा सरते ठरले जीवन ॥१

कधी कुणाला कळल्या वाचून 
दिवा जातसे तमी हरवून ॥२

या असण्याला अर्थ असावा
अन् जाण्याला शोक नसावा ॥३

कधी न थांबतो काळ चालला 
जन्म मृत्यू गाठीत अडकला ॥४

जगी दिसे हा खेळ चालला 
कळल्या वाचून अर्थ बुडाला ॥५

काय पुन्हा ते असेल जन्मणे
ठाव जरी ना तरीही मानणे ॥६

 प्रश्न उरीचे सुटल्या वाचून
कुणी फिरे उगाच वणवण ॥७

मिटले पदरव जिथे प्रश्नांचे
वेध लागले मज त्या तीराचे ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..


शनिवार, ८ मार्च, २०२५

पारिजातक

 पारिजातक
*********
महाडला असतांना शेजारच्या 
रवळेकरांच्या अंगणातील 
पारिजातकाची फुले
कोकणेच्या पाण्याच्या टाकीवर पडायची
अन् भाडेकरू असल्याने 
लाभ तिकोनेंना व्हायचा .

पारिजातकाच्या या खोडकर सवयी बद्दल 
फार पुढे कळले .
पण ती माझी पहिली ओळख 
पारिजातकाच्या फुलांची .
तो मंद सात्विक स्वर्गीय गंध 
जेव्हा भरला तना मनात 
तेव्हापासून मी झालो कायमचा ऋणी त्यांचा 

पारिजातकचा तो कोमल मृदुल हळवा स्पर्श
जाणवतच नाही हाताला
जणू तो जाणवतो सूक्ष्म देहाला 
खरतर स्थुळपणे त्याला नजरेचाच स्पर्श 
पुरा असतो आपला

ती फुले जणू जीवन जगत असूनही
जगाला न जाणवणारा संघ असतो 
सौम्य शालीन संन्याशांचा 
विरक्त भगवे वस्त्र देहावर ल्याईलेला 

परडी भर फुले देवाला वाहिली की 
देवघर रूप गंधानी भरून जाते
पण दुसऱ्या दिवशी 
त्यातील एकही फुल चटकन दिसत नाही .
जणू अस्तिव शून्य करून  मिटतात ती
प्रभू चरणाशी .
अन्  उरतात 
हवेच्या झुळकीने क्षणात उडणाऱ्या काही
धूसर पार्थिव स्मृती .

पारिजातक मला देत असतो एक धडा 
विरक्त तरीही सुंदर शालीन जीवनाचा 
क्षणात आयुष्य जगायचा .
अन्  सर्वस्व उधळायाचा  .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..


गुरुवार, ६ मार्च, २०२५

नर्मदा माईस (लळे)

नर्मदा माई (पुरवी ग लळे)
*********
माई सुख माझे मजला दिसते
कुठे जायचे ते गंतव्य कळते ॥१

तुझिया किनारी जन्म हा सरावा 
ठसा मी पणाचा पुसूनिया जावा ॥२

तुझिया संनिधी देह हा पडावा 
कण कण माझा तुझा अंश व्हावा ॥३

हळू हळू सारे इथले सुटावे 
पाश मी बांधले पिळ ही तुटावे ॥४

म्हणतात साधू सारे तू ऐकते 
मनातील आस सदा पुरविते ॥५

तव तीरी यावे तव रूप व्हावे 
तुझ्यासाठी जन्म पुन: पुन्हा घ्यावे ॥६

इतुके मागणे मागतो कृपाळे 
माय लेकराचे पुरवी ग लळे ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ५ मार्च, २०२५

अट

अट
***
कधी शब्दावाचून कळते प्रीत
कधी शब्दावाचून अडते प्रीत ॥१
करून दूर ते लाखो अडसर 
मौन फुलांनी हळू भरते अंतर ॥२
नजर नजरेस भिडल्यावाचून 
स्पर्शात झंकार उठल्यावाचून ॥३
आत कळते कुणा खोलवर 
जीव जडला असे कुणावर ॥४
पण बंद वाटा कधी झाल्यावर 
होय हरीणीची व्याकुळ नजर ॥५
जीवलग असे पैल तीरावर 
प्रवाहाला नच दिसतो उतार ॥६
काय करावे ते नच कळते 
स्वप्न समोर परि ना मिळते ॥७
त्या विरहाचे तप्त आर्त सुर 
चांदण्यास ही करतो कापूर ॥८
वर्षा गीत ते ग्रीष्मास कळते
पळसही फुलतो उकलून काटे ॥९
होते पखरण  ग्रीष्म फुलांची  
नदी आटते जन्मों जन्माची ॥१०
पण ते गाणे व्हावे बहु कातर 
जणू याचीच वाट पाहे चराचर ॥११
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 



मंगळवार, ४ मार्च, २०२५

नटपण

नटपण 
*******
स्टेज बदलते नाटक बदलते 
पात्र बदलतात प्रवेश बदलतात 
पण नट 
नट तोच असतो तसाच राहतो 
संवादात घुटमळलेला 
वेशभूषेत अडकलेला 
अन्  ते पाठांतर येते ओठी उगाच 
कुठून तरी कुठल्यातरी क्षणी 
जे पाहणार नसते ऐकणार नसते कुणी 
हे मनातील नाटक संपणे 
किती कठीण असते नाही.

खरंतर एकच नाटक 
तरी किती वेळ करायचे
जास्तीत जास्त रौप्य महोत्सव होणे 
म्हणजे खूपच झाले की
आता नवे नाटक नवे संवाद 
नवे पाठांतर हवे असते .

नवे नाटक गाजेलच असे काही नाही 
चालेलच असे काही नाही 
पण नटाचे नटपण स्वस्थ बसत नाही 
ते राहते नव्या संहिताच्या शोधात 
दिग्दर्शकला गळ घालत 
अन् घेऊ पाहते तोच गर्भ पिवळा 
सोनेरी प्रकाश झोत अंगावर 
तो जिवंत असण्याचा आभास
हवा असतो त्याला आपल्या मनावर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita

https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १ मार्च, २०२५

जाता जाता


जाता जाता
**********
जाता जाता शेवटी शेवटी टेकवला माथा 
त्या म तु अगरवाल रुग्णालयाच्या 
शेवटच्या पायरीवर 
अन भास झाला मला 
गिरनारच्या पायरीचा क्षणभर
तो तसाच आशीर्वाद हळुवार 
विसावला मस्तकावर 
तो तसाच भास उमटला माझ्यावर
स्पर्श  त्या हातांचा डोक्यावरून फिरणारा 
जाणवला मला पुन्हा एकवार 

तर इथेही तूच होतास  सतत माझ्यासोबत
 साऱ्या वादळात मला साथ देत 
कृतज्ञतेने थरारले मन हृदय आले भरून 
डोळ्याच्या कडा ओलावून निघालो मी तिथून 
मग तू मला दिसला का नाहीस आजवर 
उमटला प्रश्न मनात 
आणि असंख्य चेहऱ्यांनी
मनाचा गाभारा गेला उजळून 
दत्तात्रया किती जपलेस तू मला 
सांभाळलेस किती रूपातून 
हे रुग्णालयच गिरनार करून 
हे करुणाकरा मी उगाच तळमळत होतो 
साऱ्या पौर्णिमा व्यर्थ जातात म्हणून
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

द्वैत

द्वैत   ***** चंद्र चांदणे तुझेच होते  सुरेल गाणे तुझेच होते  मंत्रमुग्ध मी नयनी तुझ्या  असणे सारे तुझेच होते ॥ वारा किंचित असल्...