शुक्रवार, ७ जुलै, २०२३

वर्षा .

वर्षा
*****
तू आलीस तेव्हा माझे हात रिते होते 
सारे वाटून झाले होते 
काही घेणे उरले नव्हते 
खरंतर मिळवायचे किंवा हरवायचे 
सारेच हिशोब मिटून गेले होते 
पण तू आलीस तेव्हा का न कळे 
माझे हात पुन्हा जुळले 
भरून जावेसे ओंजळीला वाटले 
तू ओंजळीत मावणार नव्हतीस 
तू ओंजळीत राहणार नव्हतीस 
फटीतून अलगत गळून जाणार होतीस 
तरीही पसरले मी हात 
तुला स्पर्श करायला तुला भेटायला 
ती ओल एक विलक्षण ओलावा 
देऊन गेली जीवनाला 
तू जशी आलीस तशी गेलीस 
अन् मी  पाहिले तेव्हा 
पालवी फुटली होती माझ्या हाताला

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...