शुक्रवार, २१ जुलै, २०२३

पूनव

पूनव
******
कितीतरी लांबलेली 
अवस आज सरली 
चांदणे पांघरूनी ही 
नभी पुनव दाटली ॥

पाकळी पाकळी मनी 
नवउन्मेषी  बहरली 
शुभ्र ज्योत्स्ना अंतरंगी 
उजळूनी दीप जाहली ॥

हा स्पर्श तुझाच ऋजू 
तुझ्याविनाच जाहला 
देह सतारीचा धुंद 
कंपनांनी थरारला ॥

अन पुन्हा उधानले 
शब्द शब्द मोहरले 
आठवेना मनास या 
काय किती ते बोलले ॥

या  ऐशिया ऋतूची रे 
वाट किती मी पाहिली 
दैन्य सरे प्राक्तनाचे 
ऋतुपती दारी आले ॥

ठेव मना जपून हे 
भाग्य नव केसराचे 
घे भरुनी डोळा आता 
रंग गंध जीवनाचे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दुर्लभ

दुर्लभ ***** तुझी भक्ती दत्ता असे रे दुर्लभ  मोतीयाचा गर्भ शिंपी जैसा ॥१ ज्याची कुळवाडी असे देवभक्ती  सदाचार वृत्ती सर्वकाळ ॥२ ज...