शनिवार, २२ जुलै, २०२३

सांभाळ



सांभाळ
*******
किती रे इवली दत्ता माझी उड़ी 
उगा धडपड़ी डबक्यात ॥१
पाहतो गरुड नभी या भरारे
किव वाटते रे माझी मला ॥२
इवल्या जन्माची इवली साधना 
तिची ती गणना काय जगी ॥३
दग्ध होते तृण जसे वणव्यात
जळणे तद्वत जपीतपी ॥४
जन्म लावुनिया कुणी ते पणाला 
कुरवंडी तनाला करतात ॥५
जप कोटीकोटी नाम कणोकणी 
धन्य पुरश्चरणी होती कोणी ॥६
कोणी ध्यानमग्न काळा न गणता 
मना ते सरता करूनिया ॥७
कोणी ज्ञानयज्ञी तत्वी ठाण देती 
तेच तेरे होती सायासाने ॥८
अन मी संसारी भोगात रमतो 
क्वचित स्मरतो तुज कधी ॥९
मज खंत वाटे माझिया यत्नाची 
तुझिया भेटीची सोय नाही ॥१०
सांभाळ विक्रांता दोष न पाहता 
जवळ घे आता दयाघना ॥११
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गाणे

गाणे **** काही उरली सुरली  माझी निरोपाची गाणी घेई उचलूनी हाती देई दूर वा सोडुनी ॥१ मुठ करता रिकामी  मुठ मुठ न उरते  होते साठवले ...