सोमवार, १० जुलै, २०२३

अंतहीन

अंतहिन
*******
कुळशीळ मात जातसे वाहत 
निबीड वनात जगण्याच्या ॥
पाठीवरी ओझे जुनाट कथांचे 
फाटक्या व्यथांचे गळुनिया ॥
धरलेली हाती शून्याचीच काठी 
पथ आपटती नसलेला ॥
सरूनिया जाते पाठ केले गाणे 
मना ऐकवणे मन किती ॥
सुन्न यांत्रिकशी पाऊले चालती 
नसून माझी ती मानतो मी  ॥
वाटेत भेटती वाटवधे किती 
मारून टाकती हकनाक ॥
मरूनिया जातो मरणाचा ध्यास 
चालतो प्रवास अंतहीन ॥
उगाच टोचती काटेकुटे वेडे 
काय कधी मढे रडतसे ॥
विक्रांत शोधतो थडगे बापुडे 
नसलेली हाडे पेरायला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...