बुधवार, १२ जुलै, २०२३

देव


देव
****
दुःखाचिया पोटी देव जन्मा येती 
वेदना वाहती धर्मस्थळी 
सरता ही दुःख देवही सरतो
माणूस उरतो भोगण्याला

भीतीचिया घरी देवाची ती वस्ती 
कुणी न जाणती काय घडे 
हरवता भीती देव अनिकेत 
पूजा मंत्र नेत सवे सारे 

अज्ञाना सांगाती देव बहु किती 
भक्त ते भांडती हिरीरीने 
अज्ञान हरता देव विश्वाकार 
चैतन्य अपार सर्वा ठायी 

निश्चळ निर्मळ  करुण केवळ   
उदार प्रेमळ भूतासाठी
विक्रांत शून्यात थांबला क्षणात 
काय सांगू मात शब्द नाही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...