सोमवार, १७ जुलै, २०२३

जीवन


जीवन
*****
जीवन हा शोध असतो 
सदैव सुखाचा सदैव स्वतःचा 
अन् कळत नकळत चाललेला 
एक प्रयत्न आत्मविलोपनाचा 

नेणीवेतून उमटलेला 
देहाचा आकार 
मनाचा व्यापार 
पोटाच्या अनुषंगाने 
रोज घडणारा 
जगण्याचा व्यवहार 
याची सांगड घालताना 
जुळत नाहीत केव्हाच 
काही अदृश्य दुवे 

अतृप्तीचा पाझर 
ठिपकत असतो अस्तित्वात 
कुठेतरी खोलवर 
आणि मी माझे पणाच्या  
खुंटीवर फिरते जाणीव 
गरगर 

संताच्या शिकवणुकीचे 
रवंथ करीत 
कामनांचे शेण 
जगभर पसरवत 
जगतात सारे 
स्वतः ला धार्मिक म्हणवत

आपल्या अस्वस्थतेला 
पूजेत लपवत 
माळेत अडकवत 
जगण्याचा भ्रष्टाचार 
नाईलाज म्हणवत 
आपली असहायता 
देणगीत दडवत 
दानाने झाकत 
आपणच आपले 
डोळे झाकत 
अन् नग्नता नाकारत.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...