शुक्रवार, ७ जुलै, २०२३

जगण्याला कारण


कारण
*******

असं नाही कि जगायला 
काही कारण लागतं 
कारणा वाचूनही जगता येत 

आव्हान देत जीवन
समोर ठाकलेलं असतं 
आणि माघारी कधीच जायचं नसतं 
हे आमच्यात कुठेतरी रुजलेलं असतं 
जणू कोणीतरी लिहून ठेवलेलं असतं

आणि दुसरं असं की 
जगण्याच्या पलीकडे काय आहे 
हे आम्हालाच काय 
कुणालाही माहीत नसतं

आणि हे उगाचच किंवा
आपोआपच हाती आलेल 
विलक्षण अस्तित्व
आणि अस्तित्वा भोवती 
जमलेली सहअस्तित्व 
त्यात निर्माण झालेलं नातं 
सहजीवनाच जाळ एक भाव विश्व
हे सार नाही सोडवत 
कुणालाही 
 
नाही सोडवत
फळातील किड्याला
मांसातील अळीला
रानातील मोराला 
म्हाताऱ्या सिंहाला
तर मग माणसाला 
कसं शक्य आहे 

खरतर हे सार सुटतं
सोडून जायचं असतं 
हे जरी माणसाला  दिसतं 
माहित असतं तरीही

हे अस्तित्व नेमकं कुणाचं असतं 
देहाचं असतं की मनाच असतं 
विचारांच असतं की विकारांचं असतं 
बुद्धीचं असतं की भावनांचं असतं 
लौकिक असतं की पारलौकिक असतं 

उपनिषदात गीतेत कुराणात बायबलात 
धम्म पदात घेतलेले शोध हा तर 
शोधाचा इतिहास असतो 
त्याचा  जगण्याशी संबंध नसतो 

आपण फक्त असतो अस्तित्व 
अस्तित्वाचा शोध घेत
अस्तित्वात जगत आणि जळत
किंवा अस्तित्वाचा प्रश्नच टाळत

म्हणूनच म्हणतो तसंही जगता येतं 
जगण्याला कारण लागतच असं नाही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मेघ सावळी

मेघ सावळी ******** मेघ सावळे व्याकुळ ओले जेव्हा  निळ्या नभात जमले हर्षनाद तो गंभीर गहीरा ऐकून वेडे मन बावरले शामल रूप लोभसवाने  ...