कवितेचे रसग्रहण . मनोगत
दुसऱ्या कोणत्याही कवितेचे रसग्रहण करणे म्हणजे आपल्या चष्म्यातून त्याचे जग पाहणे असते . ते पाहणे आपल्या कलाने आपल्या मूडप्रमाणे आपल्या दर्शना प्रमाणे घडत असते . कधी कधी ते दर्शन , ते पहाणे , ते रसग्रहण कवितेपेक्षा सुंदर होते .
रसग्रहण करताना एकतर ती कविता आपल्याला आवडावी लागते किंवा बर्याचदा तो कवी आपला आवडता असावा लागतो.त्याच्या शब्दांशी भावनांशी आपण बांधले गेलेले असतो .
तर कधी ती लेखनस्फुर्ती लिहायाला भाग पाडते.
कधी कधी कविता आापल्याला आवडते पण तिचे रसग्रहण करता येत नाही . त्या कवितेचे आपल्या मनात पडलेले अव्यक्त प्रतिबिंबच आपल्याला आवडते किंवा त्या अव्यक्त प्रतिबिंबा मध्येच गुंगून राहणे आपल्याला पसंत असते . अन ते रसग्रहण करणे म्हणजे परीक्षेला बसणे असे वाटते.
कधी कधी एकाच कवितेमध्ये अनेक अर्थ दडलेले असतात .ते शोधून काढणे मोठे गमतीचे आणि आनंदाची गोष्ट असते. एक प्रकारचा आनंदाचा खेळ असतो .पुन्हा एकदा सांगायचे म्हणजे सगळेच खेळ सगळ्यांना आवडतात असे नाही .
आता माझ्या कवितेबद्दल बोलायचे झाले तर
आसावरी ताईंनी या कवितेतील पहिला स्वर पकडला तो अकार
स्वाती ताईंनी त्याच्यामध्ये उकार मिसळला तर रेखाताईं नी सुंदर दिर्घ मकार लावून कवितेला ओमकार रुपी प्रशस्ती दिली आहे.
खरेच रेखाताईंनी तिचे फार सविस्तर सु्ंदर रसग्रहण केले आहे.
आता या माझ्या कविते बद्दल मी थोडे बोलतो.
या कवितेमध्ये मी तीन रूपक घेतली आहेत त्यापैकी पहिले रूपक आसावरी त्यांनी त्वरित ओळखले स्वातीताई अन रेखाताईनी ते उलगडले
तर या कवितेचा पहिला अर्थ उलगडलेला आहे तो कविता आणि कवी यांच्यामधील नात्याचा. त्यांनी त्यास अचूकतेने पकडले आहे . ते शब्द सुचणे न सुचणे शब्द सूचूनही कवितेमध्ये न बसणे किंवा अर्थ ध्वनी व्यक्त न होणे अशा प्रकारचे कविते मधील तळमळणे आपण सर्वांनीच अनुभवले असेल .
कवितेमधील दुसरा अर्थ आहे तो आहे प्रियकराने आपल्या प्रियेला जाणण्याचा केलेला प्रयत्न .
स्त्री कधीच कोणाला कळत नाही हे एक सत्य आहे .ती एक अगम्य अनोखी अप्रतिम अदा (वस्तु म्हणणे बरे वाटत नाही) परमेश्वराने निर्माण केली आहे . तरीही ती कळावी, आत्मसात व्हावी ,आपण तिच्या जगण्याशी तिच्या मनाशी तिच्या भावनेशी एकरूप व्हावे ही एक नैसर्गिक प्रवृत्ती पुरुषा मध्ये असते, ती येथे व्यक्त होते. , मला वाटते तो एक अपूर्णातून पूर्णत्वाकडे जाणारा ध्यास असतो. एक अस्थैर्यतून स्थैर्याकडे घडणारा प्रवास असतो.
कवितेमध्ये आणखीन एक रूपक दडलेले आहे ते रूपक आहे योग्याच्या शरीरात जेव्हा कुंडलिनी शक्ती, ती जगदंबा जागृत होते त्यावेळेला त्याला होणाऱ्या अनुभवाचे प्रतिबिंब या कवितेमध्ये पडलेले दिसते .कधी या कुंडलीनी शक्तीचा आवेग हा तीव्र असते की ती त्याला झोडपून टाकते .तर कधी ती जाणवतही नाही .मनाच्या ही पलीकडे जाण्याअगोदर मनाचा त्या शक्तीशी जो अभिसार होतो खेळ होत असतो त्या खेळात रंगात नटलेली ही कविता आहे .
सना यांनी आग्रहाने मला काविता द्यायला लावली .माझी टाळाटाळ धुडकावून लावली.त्या बद्दल धन्यवाद .
पुन्हा एकदा सर्वांचे आभार .
असे कसे म्हणू
***********
जर का तू अजूनही
सापडली नाहीस मला
तर तू हरवली आहेस
असे कसे म्हणू मी तुला॥
जर का तू अजूनही
दिसलीच नाहीस मला
तर तू कळली आहेस
असे कसे म्हणू मी तुला॥
तुझे सोनसळी लावण्य
अन उर्जेचे अवतरण
मजला जाणवत नाही
असे कसे म्हणू मी तुला॥
एक अनाकलनिय
गुढ तरीही हवे हवेसे
अनूभुतीचे जग नकोय
असे कसे म्हणू मी तुला॥
येण्या जाण्याचे सारेच
स्वातंत्र्य आहे तुला
तू बेपर्वा चंचल आहेस
असे कसे म्हणू मी तुला॥
शक्ती वृती जगण्याची
आस प्यास ह्रदयाची
तुुला विसरून जगावे
असे कसे म्हणू मी तुला॥
स्वप्नांचा देश दाखवते
सुखाची सावली होते
तुझी प्रतिक्षा सुंदर नाही
असे कसे म्हणू मी तुला ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘