सोमवार, १३ जून, २०२२

मळलेली संध्याकाळ


मळलेली संध्याकाळ
***********

मळलेली संध्याकाळ 
होती ओघळत
राक्षसी इमारतीच्या 
भिंतीवरून 
साऱ्या तावदानात 
विटलेले रूप 
आपले पाहत  

खर्रखटक खर्रखटक
चायनीजचा झारा होता
कढईवर  आपटत 
तिखट जळता 
दर्प हवेत सोडत 
फुटपाथवर टाकून
जुनाट खुर्च्या 
झाकली दारू 
होते कुणी ढोसत

अन पलिकडे 
स्वीट मार्टसमोर 
सुटलेले देह 
प्रमाणाबाहेर
एक एक करत 
ताव मारत 
पाणीपुरीवर

भरभरून वाहत 
टीएमटीचे धुड
करीत खडखडाट 
प्रत्येक स्पीड ब्रेकरवर .

रिक्षा भूक लागल्यागत 
चेव येऊन होत्या घुसत 
इकडे तिकडे
जोरात किंचाळत

माणसेच माणसे 
गवतासारखी 
उगवलेली सगळीकडे 
रस्त्यावर फुटपाथवर
दुकानात अन बाहेर
अस्ताव्यस्त अनिर्बंध 
काळाचा कण गिळत 
वा काळ त्यांना गिळत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दत्त बडवतो

दत्त बडवतो ********* दत्त बडवतो मज बडवू दे  दत्त रडवतो मज रडवू दे  फटका बसता जागृती येता कुठे जायचे मज कळू दे  ॥१ प्रवाही वाहून ...