*****************
साखरेला आपण साखर असल्याचा
कधीच वीट येत नाही
कधीच कंटाळा येत नाही
किंबहुना गोडी शिवाय
साखरेची कल्पनाच करवत नाही
त्याप्रमाणे डॉक्टर उज्वला पवार यांना त्यांच्यातील प्रामाणिकपणाचा
सचोटीचा कर्तव्यपरायणतेचा
कधीच कंटाळा येत नाही
चंद्राला मुळी चांदण्याची फिकीर नसते
हे चांदणे त्याच्यातून विलसतअसते
सूर्यालाही प्रकाशाची चिंता नसते
त्याचे अस्तित्वच प्रकाश असते
पाण्याला शीतलता मिळवावी लागत नाही
त्यात अंगभूत गुण असते
त्याप्रमाणे डॉक्टर पवार यांचात
कष्टाळूपणा प्रेमळपणा
नीटनेटकेपणा नेमकेपणा
हे वसलेले आहेत
त्या या गुणाचे मुर्तिमंत रूप आहेत .
त्यांचे ते रुग्णासाठी धावणे
रिपोर्ट मागे लागणे
रुग्णाचा विचार करत बसणे
आणि आपलं चुकलं तर नाही ना
याच्या धास्तीने आपल्या
सहकार्याशी सल्लामसलत करणे .
यानंतर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये
काम करताना ते रिपोर्ट तयार करणे
सांखिकी टेबल तयार आखणे
फायलिंग करणे
सर्व सविस्तर अभ्यास करणे
एक ओसी कटाक्षाने आपल्याकडे ठेवणे
स्वतः व्यक्तिगतरीत्या
वेगवेगळ्या विभागात जाऊन
तिथून सर्व माहिती घेणे
हे सारे पाहिले की असं वाटायचे
या चुकून बिएमसी मध्ये आल्या की काय?
आणि एवढे कष्ट करूनही
त्याचे फळ समोर येऊन
कोणी जरी घेऊन गेले तरी,
त्यांना त्याबद्दल फारसं दुःख वाटायचे नाही
वाईट वाटायचे पण दुःख वाटायचे नाही
आणि ते वाईट वाटणं सहज सोडून
त्या पुन्हा आपल्या कामाला लागायच्या.
त्यांची बुद्धिमत्ता चौकसपणा
अभ्यासवृत्ती सारे कसे दांडगे
पण त्यांनी रुग्णालयाचे नेतृत्व
स्वीकारायचे का टाळले
मला न पडलेले कोडेच आहे
कदाचित त्या एक प्रकारच्या
शांतीमध्ये आनंदामध्ये समाधानामध्ये
आपण बरे आणि आपले काम बरे
आपले घर बरे
या कोशांमध्ये सुखी होत्या
त्यामुळे प्रसिद्धीपराडमुख वृति
त्यांनी आपोआप साध्य केली होती
त्यांचा स्वभावामधील
त्यांची संवेदनशीलता
हा त्यांचा जसा प्लस पॉईंट आहे
तसाच वीक पॉईंट सुद्धा आहे
त्यामुळे त्यांना कोणी उलटे बोलले
अपमान केला तुटक वागले
त्यांच्याशी बोलायचे कमी केले
तर त्यांना अतिशय दुःख होत असे
कारण त्यांनी आयुष्यात
माणूसकीला प्राधान्य दिले होते
त्यामुळे माणूस सुटला की
आपल्या माणुसकी मध्ये
काहीतरी कमी पडले की काय
अशी शंका त्यांना येत असावी
हे एवढे सदगुण या
कुठून घेवून आल्या असतील बरे ?
असा प्रश्न मला पडत असे
पण ज्या वेळेला मला
त्यांच्या वडिलांची वारकरी परंपरा कळली
तेव्हा त्याचा उलगडा झाला
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी !!
संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे तुम्हालाही आठवत असेल .
तर तेव्हा जाणवले की वैष्णवांचे हे
कितीतरी अंगभूत स्वभाव गुण
त्यांच्यामध्ये आपोआपच उतरले आहे
अर्थात नॉनव्हेज बनवण्यामध्ये त्या
एकदम तरबेज असल्या तरीही . .
त्या बाबतीत त्या पक्क्या कोकणी आहेत
म्हणूनच लोकांना खाऊ घालायला
यांना फार आवडते
शशी आणि मयूर हे त्यांचे
बहिश्च प्राण आहेत
हे मला कुर्ला भाभा मध्ये मी
पंच्यानो साली आलो
तेव्हा पासून कळले होते
आणि आता ही ते चित्र तसेच आहे .
किती नशिबवान पितापुत्र आहेत हे
त्यांना आपला घर संसार
किती प्रिय आहे
हे आम्हाला, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना
पक्के माहित आहे
त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना
त्यांच्या आवडत्या घरात
द्यायला भरपूर वेळ मिळेल
किंबहुना हे त्यांचे आवडते ठिकाण आहे
देवुळ आहे पिकनिक स्थळ आहे
त्या त्यात रममान होणार यात शंका नाही.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा