मी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १४ एप्रिल, २०२३

मी

मी
***
निशब्द एकांतात मनाच्या कुहरात 
जाणीवेच्या जगात 
उरलेला मी ॥१
अगणित अनंत आभाळाचे पट 
सहजच मिटत 
चाललेला मी ॥२
उमटला आघातात निघाला कानात 
शब्द त्या दरम्यान 
होतो जणू मी ॥३
डोळे तव रोखले करूणेने भरले
अस्तित्वच जाहले 
पाहणारा मी ॥४
मग माझ्यातले प्रश्नचिन्ह थोरले 
होवुनिया ठाकले 
शोधणारे मी ॥५
प्रश्ना पलिकडला उत्तरा अलिकडला 
संवाद खिळलेला 
घन मौन मी ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, ८ जून, २०२२

आकाश

 आकाश
********
आकाश  पसरलेले 
गर्द निळे  अथांग गहन  
अंत नसलेले 
कधीचे कुणाचे कशाचे
होवून प्रश्न न सुटलेले

अन मी !
एक बुडबुडा साक्षीचा 
होऊन डोळा प्रकाशाचा 
उंच फेकला गेला गोळा 
कुण्या अज्ञात आयुष्याचा 
न जाणता कसला कशाचा 

म्हटले तर होतो .
म्हटले तर नव्हतो 
पण माझ्यावाचून 
दुजा कोण असतो 
जगताला 
जाणणारा 
आणि
जन्म देणारा
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

अस्तित्व आणि मी

अस्तित्व आणि मी
**************

माझ्या असण्याचे आणि 
अस्तित्वाचे
किती अर्थ निघती 
युगोनुयुगे 
तरीही नाही कळत 
चार्वाक सांख्य द्वैताद्वैत 
विशिष्टाद्वैत 
बौद्ध जैन वेदांत 
किती तत्वज्ञान 
किती मतमतांतरे 
माझ्या या मी च्या शोधात 
धुंडाळली मी 
पालथी घातली राने 
वाहिले पुस्तकांचे भार
भरली कपाटे 
ऐकली व्याख्याने 
काढलेल्या नोट्स 
भेटलो संतांना धर्मगुरूंना दीक्षागुरूंना 
केले प्रयोग
जाहली दर्शने 
तथाकथित अनुभूती 
विलक्षण स्वप्नही 
पण या मी चे काठिण्य 
ते तसेच आहे 
हा मी होतो कधी भक्त 
कधी ज्ञानी कधी विरागी 
कधी कवी कधी समाज सेवक 
कळवतो दीनांच्या दुःखाने
हळहळतो रुग्णांच्या पीडेने  
मदतीला धावतो कधी 
राष्ट्रभक्त होतो कधी 
दानशूर होतो 
पण त्या अंतस्थ गाभ्याचे दर्शन 
कधीच होत नाही 
तो मी सदैव विद्यमान असतो 
होय मी वाचली आहेत 
त्रिपुटी द्रष्टा दृश्य दर्शनाची 
ऐकली आहेत प्रवचने कृष्णमूर्तींची 
व्हेन ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्हड सूत्र असलेली 
आणि मला मान्य करावे लागेल 
की ती अदृश्य चावी 
मला अजूनही सापडलेली नाही 
मी नावाचे कुलूप तोडणारी 
कधी कधी वाटते 
खरेच का ही कुलूप 
असेल अस्तित्वात 
ज्याला मी मी म्हणतो 
ती देहातील इंटिटी 
पेशींचा हा समूह हा आकार 
तो वागवत असलेली ती जाणीव 
कुणास ठाऊक 
पण हे कळेपर्यंत तरी 
हा प्रश्नरूपी सिंदबादचा म्हातारा 
उतरणार नाही पाठीवरुन 
हे नक्की


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

न्याय

न्याय ****** तीच न्याय संस्था फाशी सुनावते  तीच न्याय संस्था निर्दोषही ठरवते  व्यक्ती तीच असते  आरोपही तेच असतात  सुनावनी तशीच ह...