तसे तर वाहून
गेलेत बरेच शब्द
हातातून मनातून कवितातून
धरून ठेवायचे कारणच
नव्हते
आणि इच्छाही
नव्हती
खरतर त्यांच्या
वाहण्यानेच
अर्थ उमलले जात
होते
आणि त्याच्या सोबत
उलगडत होतो मी ही
मला
शब्द माझा शेवटचा
मोह
हे माहित आहे मला
आणि शब्दांच्या
पलीकडे
माझे गंतव्य आहे
हे ही माहित आहे
मला
जगाचे तकलादू व्यवहार
सांडून
मनात नाचणारे हे
शब्द
ते नसते तर
मी जगूच शकलो
नसतो
प्रेमाच्या
मर्यादा जाणून चुकलो मी
यशाच्या गोडीला
कंटाळलो मी
सत्तेच्या मूर्खपणाला
वैतागलो मी
जगण्याचे नाटक
वठवत
नात्यातील पसारा
सांभाळत
आयुष्य ढकलत
चाललो मी
पण केवळ आणि केवळ
या सरळ रेषेला
लटकून
रफार मात्रां
वेलांटी उकार
यांची सर्कस
करणाऱ्या
या शब्दांना धरून
मान्य आहे मला
शब्द निर्जीव
असतात
कागदावर उमटलेले
काही आकार असतात
काही लोकांसाठी
तर ते
म्हशीचेच रंग
असतात
पण मी पाहिलेत
इतके रंग
इतके आकार आणि
स्वप्ने त्यात
की जणू डुंबलो सुखाच्या
सागरात
त्या खुणा मना
पलीकडच्या
त्या कल्पना कुणी
करून ठेवलेल्या
त्या अनुभूती
विश्वासा न बसणाऱ्या
माझ्या अविभाज्य
भाग झाल्या आहेत
आता माझ्या नगण्य
अस्तित्वात
मी पाहतो ती
संभावना
ती आशा ते साहस
ती आकांक्षा
जी करू शकते भेद
या जाणीवेत
दडलेल्या आकाशाचा
या शब्दांच्या
आशिर्वादामुळेच
मी म्हणून मी आहे
माझे पणाला अर्थ आहे
काही कारण जगण्याला
काही जळत राहण्याला..
प्रकाशाचा स्पर्श
सोनेरी
होत असतो अंतराला
डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा