मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७

वेड




समजाविता कुणास
मीच भारावून गेलो
कळेना कसा मजला  
मीच हरवून आलो

ठाव नसे काही पण
नवीन होवून आलो
नाव गाव सांडूनिया
जग विसरून आलो  

कुणाचे ते वेड नवे
असे पांघरून आलो
पावसात वेड्याखुळ्या
मन भिजवून आलो 

स्पर्श हळवे काही ते
उरात घेवून आलो  
भेटण्यास पुन:पुन्हा
क्षण रुजवून आलो

हारलेली जिंदगी ही
पुन्हा उधळून आलो  
कुणासाठी जन्म माझा
पणास लावून आलो

काच दालनात होती
मूर्त ती पाहून आलो  
फुल एक मग तिथे 
उगा ठेवूनिया आलो

सुवर्ण धूसर आशा
मनात बांधून आलो
एक ओळख जीवना
नवीन देवून आलो

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

निरोप




निरोप

त्या तुझ्या बोलात मुळी   
नाही तू जाणत होतो 
शब्दावाचून सखी मी
तुलाच ऐकत होतो

बोल तर सदाचेच
उगे बहाणे जगाचे
धडकने हृदयाचे
मी श्वास ऐकत होतो

सरणारा काळ क्रूर
काट्यांचेच क्षण होते
नको तरी टिकटिक
मी उगा ऐकत होतो  

होते तुझेच व्यथित
अंतर क्षुब्ध  पेटले
सुखाची शपथ तुझ्या
मी तुला वाहत होतो

हा नाही तर नसू दे  
जन्म पुढे ठेवलेला
त्या क्षणाची शपथ मी
आताच वाहत होतो

थबकल्या वाटा इथे
मार्ग सारे अडलेले
कवाड हृदयाचे मी
उघडे सांगत होतो  

आणि वाट परतीची
डोळ्यात तुझ्या भरता
कल्लोळ सावरत मी
हात हलवत होतो .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


भेटून येता ...




भेटून येता ...

त्या क्षणाला
असे भेटून येता
स्पर्शातून कृतज्ञता
कधी ओघळता 

शांत झाले मन
देवालयी जणू
भगवती तूच ती  
व्यापून अणुरेणु

मौनातून गुह्य
किती आकळले
प्रकाशात तुझ्या
जग उजळले 

जगणे भेटले
पुन्हा तापसाला
प्रसाद तुझा मी
हातात घेतला 

मांगल्य तूची या
आधार मनाला
दिलेस चैतन्य
पुन्हा या शवाला

दे जन्म दे वा
दे मृत्यू मला
पदी तुझ्या मी
हा जन्म वाहिला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


अरुण व स्नेहासाठी लिहलेली कविता



स्नेह पल्लवी तुझ्या सखी मी
बंदिवान जरी किती सुखी मी ||
बालपणीची तू मैत्रीण लाभली  
सहचारिणी होय यौवनातली ||
या गळ्यातील मौतिकमाला
तू हर्ष व्यापला या हृदयाला ||
गौरवर्णा सखी कमलनयना
कनक भूषणी गमे देवांगना ||
चित्त विलोपणा सौख कामना
अशीच भरुनी या रहा जीवना ||

Feelings of Arun for sneha
On snehas birthday    
I just put them in words


डॉ.विक्रांत तिकोने 

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

खेळ हा कशाचा **





खेळ हा कशाचा
************

देहात कोंडलेला
श्वास हा कुणाचा
मनात चालणारा
खेळ हा कशाचा

का शोधतो जीव
हा तुकडा सुखाचा
कळेना तरी मार्ग
शोधे तो यशाचा  

भिजताच माती ये
जन्म अंकुराला
आकाश किती ते
ना माहित कुणाला

उन वारा पावूस
हा वृक्ष आकारला
वखार ओंडक्यांची
ती ठाव न त्याला


साराच सिनेमा
हा असे ठरलेला
रीळ पुढे धावे
नि सीन बांधलेला

उजेडी भरे मनी
भाव भावनेला
मागचा दिवा तो
कुणी लावलेला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७

प्राजक्त





पुन्हा एक शुभ्र सडा
पडे माझ्या अंगणात
दरवळे गंध तोच
आज या कणाकणात

भूमीवर सांडलेले
चांदणे ते घनदाट
कोमलता कोंडलेली
होती जणू त्या क्षणात

एक एक शब्द होता
ओघाळता शुन्य नाद
रानीवनी पोहचला
गूढ त्याचा पडसाद

कसा जन्म कसा मृत्यू
घटनेला अर्थ नाही
प्राजक्ताचा जन्म मनी
पेक्षा जीणे सार्थ नाही
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने.



 https://kavitesathikavita.blogspot.in/ 

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

अघोरी






अघोरी

त्या तुझ्या तिसऱ्या डोळ्याने
मी मला पाहतो निरखून
आणि आश्चर्य दिसते कि
मी जळतच नाही अजून

मी मनाचा तरंग होवून
मी तृष्णेचा गंध लेवून
भिरभिरतो त्याच पथाने
तारे वारे हृदयात भरून

आणि कुठल्या व्याकुळ नयनी
आयुष्याला देतो उधळून
क्षणाक्षणाला जळते चिता
उबेत तिच्या राहतो बसून

दिसे भोवती रुंडमाला
पांढुरका रंग पसरला
तडतडणारा शब्द आणि
सरल्या गर्दीचा पसारा

अरे असू दे हे माझ्यासाठी
मी तर आहे एक अघोरी
बेपर्वा बेहोष स्मशानी
नृत्य सुखाचे अखंड करी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in


गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

फुलझडी २




फुलझडी



ती मंत्रमुग्ध नजर
खिळलेली कुणावर
अजाणता क्षणभर
मी व्याकुळ जन्मभर

ते ओझरते  पाहणे
कुणी हरखून जाणे
मनात फुलझडीचे
अजून तडतडणे

माझे सजलेले गाणे
जन्म फुलांनी भरणे
तिचे व्याकुळ तराने
स्मृती सुवर्णी खिळणे

तुझी माझी भेट जरी
परत होणार नाही
माझ्यात तुझे असणे
कधी मिटणार नाही


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
kavitesathikavita.blogspot.in

फुलझडी १






 फुलझडी १

तुजला पाहता मन फुलझडी।।
स्वरूपाची गोडी कळे त्याला ।।

तुझिया स्मरणे येते मोहरून
गंधाने वेढून जातो देह ।।

क्षणांचे आयुष्य देतो उधळून
तुजला जाणून अतरंगी

सावळा सुंदर  प्राणांचा विसावा
मनी या राहावा सदोतीत ।।


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

हे मायेचे रूप मनोहर




हे मायेचे रूप मनोहर
जीव अजुनी होय अनावर
अन मातीच्या वृक्षाला या
अजुनी येतो मुग्ध मोहर

सरला ऋतू काल वसंती
तरीही मनी शरद अजुनी
तमात गेली विझली गाणी
सूर कुठूनी हे येती कानी

सुटली साथ स्पर्श हरवले
नावा पुरते नाते राहिले
कोन्यामधल्या अंधारास    
फुटता कुपी गंधी व्यापले

जन्म धावतो कळल्यावाचुनी
कशास घटते अशी कहाणी
मिटता मिटता पान पापणी
दार उघडते स्वप्न दालनी

अंती काय ते मना न कळते
फिरणे नाही नदी जाणते
झगमगत्या रंगात अखंड  
जललहरींचे नृत्य चालते

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


रंग

रंग **** एक माझा रंग आहे  रंग माझा मळलेला  लाल माती चढलेला भगव्यात गढलेला ॥ आत एक धिंगा चाले  मन एकांतात रंगे घरदार अवधूत  स्वप्...