शुक्रवार, ३० जानेवारी, २०१५

प्रेम अन मैत्री






ठिक सखी जावू दे ते  
मना लावून घेवू नकोस
माझ मन मोडलं म्हणून
तूच अशी रडू नकोस

मित्र होतो आपण सदैव
मित्रच राहणार आहोत
उठले होते वादळ इवले
विसरून जाणार आहोत

होतं असं कधी कधी
उगाच पावूस पडतो कधी
प्रेम मैत्री मधली सीमा
उमजत नाही कधी कधी

उद्या पुन्हा भेटू या
तश्याच गप्पा मारू या
उणे दुणे गप्पा खोड्या   
त्याच रस्त्याने जावू या

विक्रांत प्रभाकर

मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

भाग्यवान जन्म काही





भाग्यवान जन्म काही
योगभ्रष्ट असतात
रोमहर्षी कथा त्यांच्या
उरी आग लावतात

वाया गेला जन्म माझा
कानी काही सांगतात
पांगुळले पाय माझे
कुबड्याही तुटतात

ग्लानी येते औदासिन्य
कठोकाठ भरतात
नापसाची मार्कलिस्ट
जीवावर टांगतात

का रे दिली भूक अशी
ज्याची पूर्तताच नाही
रानोमाळ धावे पिसा
घडीभर छाया नाही

म्हणू नको केली नाही
काही आटाआटी मी ही
नावडतीचे मीठ त्वा
पण चाखलेच नाही

नसे जर पुण्य काही  
थोडा फक्त भाव दे रे
मरणाऱ्या चातकाच्या
मुखी जल थेंब दे रे  

विक्रांत प्रभाकर





सोमवार, २६ जानेवारी, २०१५

तुला वजा केल्यावर..




तुला वजा केल्यावर
वजाबाकी सवे
वजा करणाराही
उरत नाही   
असा तू कणोकणी
भरलेला मनोमनी
तुझ्या बाबतीत
होऊ शकतात  
त्या फक्त बेरजा
आणि गुणाकार  
प्रेमाच्या भक्तीच्या
ज्ञानाच्या आकलनाच्या
अन ज्यांना वाटते
आपण केली आहे
वजबाकी तुझी
नस्तिकतेच्या सिद्धांताने  
त्यांचे गणित खरोखर
संपलेले असते

विक्रांत प्रभाकर





झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...