रविवार, ४ जानेवारी, २०२६

तो भेटतो

तो भेटतो
*******
तो न भेटतो जपाने 
तो न भेटतो तपाने
तो भेटतो केवळ रे 
फक्त त्याच्याच कृपेने ॥१

तो न भेटतो पूजेने 
तो न भेटतो गायने 
तो भेटतो केवळ रे 
फक्त त्याच्याच कृपेने ॥२

तो न भेटतो बलाने 
तो न भेटतो धनाने 
तो भेटतो केवळ रे 
फक्त त्याच्याच कृपेने ॥३

तरी सारी कवाईत 
भाग आहे रे करणे 
अनुसंधानाचे दोर 
हाती धरून ठेवणे ॥४

हाती आहे नांगरणे 
बीज पेरून ठेवणे
आणि राखण करणे 
नाही पाऊस पडणे ॥५

तो भेटतो सदा तयाला 
हवा आहे तो जयाला 
पण त्या ही भेटण्याला 
नियम नाही कुठला ॥६

तो भेटतो याच क्षणी 
किंवा नच युगोयुगी 
परी निराशे वाचूनी 
ठेव प्रतिक्षा तू जागी ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ३ जानेवारी, २०२६

हरवला दत्त

हरवला दत्त
***
हरवला दत्त इथल्या गर्दीत
निघाला शोधीत निवाऱ्याला ॥१

पावलोपावली लागतात ठेचा 
पथ माणसांचा हरवला ॥२

घुसमटे श्वास सोनियाच्या धुरी
क्रूर वाटमारी जागो जागी ॥३

कोटी प्रार्थनाचा चाले गलबला 
स्वर थकलेला हर एक ॥४

तारावे कुणाला मारावे कुणाला
हात थबकला करुणेने ॥५

जगून मरणे मरून सुटणे 
घट्ट तरी जिणे लोंबकळे ॥६

कर्म दरिद्रयाची रेषा या शहरा ?
काय देवा झाला निरुपाय .? ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

दातृत्व

दातृत्व 
******
हे रंग तुझे जीवना मला कळत नाही
ही लाट सुखाची अन् हाती मावत नाही ॥

धुसरल्या आकाशात जीव उंच उडू जाई 
बंध अदृष्य रेशमी मन हे त्यातही पाही ॥

क्षणिकाचे भान जरी लाटा येती आणि जाती
या कल्लोळी भावनांच्या वादळे उठती किती ॥

तुटलेले दोर कैसे पुनरपि जुळू येती 
भरकटल्या पतंगा पुन्हा मिळे कैसी गती ॥

हे पर्व किती दिसांचे मजला ठाऊक नाही 
चक्र दिन रजनीचे मनातून जात नाही ॥

पुसायचा नाही कधी काळोख दाटला मनी मिरवायचा ना कधी प्रकाश आला भरुनी ॥

हलकेच मला हे तू सांगून गेलास कानी
आज तुझ्या दातृत्वाने गेलो विस्मित होऊनी ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, १ जानेवारी, २०२६

आळंदी जाईन

आळंदी जाईन 
**********

अगा मी जाईन आळंदी राहीन 
रोज गं पाहीन ज्ञानदेवा ॥

अगा मी रंगेन संतांना भेटेन 
पायी लोटांगण घेत तया ॥

अगा इंद्रायणी नित्य मी न्हाईन
पुण्याच्या जोडीन महाराशी ॥

अगा ज्ञानदेवी नित्य पारायण
 अन्न हे सेवेन  आत्मयाचे ॥

अगा मी होईन तेथला किंकर
सेवेशी सादर सर्वकाळ ॥

ऐसे ज्ञानदेवा कर माझे आई 
याहून गे काही इच्छा नाही ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

काळ

काळ
*****
आला काळ गेला काळ
तरीही कुठे न गेला काळ 
काय कुणा सापडला तो 
आकड्यामध्ये मोजून साल 

स्मरणा मध्ये साठतो काळ
मरणा मध्ये  गोठतो काळ
स्मरणा मरणा ओलांडून 
फक्त क्षणात असतो काळ

म्हटले तर असतो काळ
म्हटले तर नसतो काळ
तरीही जीर्ण तनु मधून 
हलकेच डोकावतो काळ

स्वप्न सुखाचे असतो काळ 
स्वप्न उद्याचे रचतो काळ
जगण्याला या जीवनाला 
अर्थ नवा देत असतो काळ 

अर्थासाठी परि पसरले 
हात तेवढे पाहतो काळ 
हेच घडावे घडणे मित्रा 
होऊन वर्ष सांगतो काळ 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरी
******
गीतेच्या मांडवी वेल ज्ञानेश्वरी 
कुसुम कुसरी सजलेली ॥१

एकेक शब्दाच्या अगणित छटा 
वाटेतून वाटा मोक्षाच्या गा ॥२

काव्य कौतुकात रंगता जीवन 
जाते हरवून सहजच ॥३

अर्थाच्या एखाद्या मनस्वी स्पर्शात 
मृत्यूचे संघाट हरवती ॥४

ऐसी दैवीवाणी  होणे पुनरपी 
नाही रे कदापी इये लोकी ॥५

अगा मराठीया इथे जन्मलेल्या 
ओलांडून भाग्या जाऊ नको ॥६

ओवी श्रवणी वा येऊ देत मुखात 
जन्म पै सुखात नांदशील ॥७

नाही रे सांगत विक्रांत मनीचे 
संतांच्या मुखीचे अनुभव हे ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २८ डिसेंबर, २०२५

मंगेशसाठी

मंगेशसाठी
(वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.)
*********

एक पक्षी व्हावे वाटते
मला कधी मंगेश साठी 
पण कावळा चिमणी नको 
दुर्मिळ थोडा रंगा साठी

मित्रांचा मित्र तसा तो 
पण जिवलग पक्ष्यासाठी 
नाव कुठलेही सांगो तो 
हो म्हणावे दोस्ती साठी 

कधी काही राहतात भेटी 
मैत्रीच्या ना बसतात गाठी 
रुखरुखं ती ही मिटून जाईल 
होवून पक्षी त्याच्यासाठी 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...