शनिवार, १५ मे, २०२१

वठताच झाड



वठताच वृक्ष 
**********

वठताच वृक्ष 
पक्षी उडून जातात 
घरटी खाली होतात 
आणि उरते ते फक्त 
वृक्षाचे एकटेपण 
त्यात पक्ष्यांची 
काहीच चूक नसते 
अन वृक्षाचेही 
काही चुकलेले नसते 

हा नियम आहे जगण्याचा 
वठलेल्या झाडाला कवटाळून 
जर  पक्षी बसले असते
तर त्यांचे मरण ठरलेले होते

होय तो वृक्ष सुंदर होता 
फळाफुलांनी बहरला होता 
कित्येक पिढ्या पक्ष्यांच्या 
अंगाखांद्यावर वाढवल्या त्याने 
कित्येक पाखरांना पांथस्थांना 
सावली दिली आहे त्याने 

पण आता तो वठला 
हे सत्य आहे 
कुठल्यातरी वादळात 
जोराच्या पावसात 
कधीतरी उन्मळून पडेल तो 
जसा प्रत्येक वृक्ष वाढतो 
फळतो फुलतो आणि वठतो

वृक्षाशी ज्यांना बोलता येते 
त्यांना विचारून पहा 
ते सांगतील 
म्हणूनच 
कुठलाही वृक्ष रडत नाही
कधीच कुढत नाही
 
खरं तर त्याच्या प्रत्येक पानातून 
तो रोज मरत असतो 
माती होऊन पुन्हा रूजत असतो 
बहरत असतो 
ते क्षण दिवसांचे असते 
अन हे कायमचे असते 
त्या आकृती पुरते

पण तो येणारच असतो पुन्हा 
जसा मी आलो आहे 
आलो होतो 
आणि येणार आहे 

कारण जीवन अनंत आहे 
ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे 
प्रज्ञेच्याही पलीकडे 
म्हणूनच मृत्यूसकट या जीवनाच्या
संपूर्ण स्वीकारातच 
मुक्ती आहे .
इथे या क्षणी

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...