गुरुवार, २० मे, २०२१

शिव शक्ति

शिव शक्ति
🌸🌸🌸

हे "मी" नावाचे सॉफ्टवेअर 
इंस्टॉल केले गेले असेल 
रुजणाऱ्या गर्भात केव्हातरी
अन ऍक्टिव्हेट केले गेले असेल 
वयाच्या तिसर्‍या चवथ्या वर्षात 
त्यात असलेल्या अनेक 
छोट्या वायरस सकट .

त्याला वापरत आणि अपडेट करत 
ठेपतो एका क्षणापर्यंत वापरणारा
पण जेव्हा हार्डवेअर आऊटडेटेड होतं 
सारखे सारखे क्रश होऊन 
तो वापरणारा  हवालदिल होतो
आणि ठरवतो स्क्रॅप करून 
नवीन हार्डवेअर अन 
सवे सॉफ्टवेअर आणायचं 

तोवर माहित नसतं "मी" ला 
की तो यूजर नाही म्हणून 
फक्त एक सॉफ्टवेअर आहे 
युजर नाव असलेलं 
मग डाउनलोड केलेली 
सारी इन्फॉर्मेशन सारा डेटा 
"मी" च्याच साह्याने "मी" ला वगळून 
ठेवला जातो बॅकअप म्हणून 
(अर्थात ती कुणाचीच नसते 
खरतर हा वेगळाच विषय आहे.)
मग मी ला वाटते 
आता मरणारच नाही
अन मेलो तरी 
पुनर्जन्म होईलच म्हणून 

अन एक दिवस 
शेवटचाच म्हणून 
शट डाऊन केलेला प्रोग्रॅम 
जातो हार्डवेअर सकट 
रि सायकलच्या जंक मध्ये 
हार्डवेअर जाते तुटून वितळून 
पण त्यात असलेले ते 
"मी" चे सॉफ्टवेअर 
त्याचे ते बायनरी कोड मधील अस्तित्व 
ते काय असते?  कुठे जाते ?
त्याच्यातील 
आर्टिफिशियल इंटेलिजन्स सकट

कुणी म्हणते  
ते मुळात नसतेच 
तो फक्त भास असतो 
दृश्यमान होणारा 
जगत रुपी कॉम्प्युटरच्या
स्क्रीन वरती

दृश्य असून अदृश्य असणारा 
अदृष्य होऊनही दृश्यात दिसणारा 
हीच वेदांतातील 
माया. .
दिसणारी भासणारी पण नसणारी
किंवा शैवातील मधली 
शक्ति . .
ती आहे म्हणुन शिव आहे 
जी शिवामुळेच आहे
पण ती जाताच शिवही नाही.

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...