बुधवार, २६ मे, २०२१

बुद्धत्व


बुद्धत्व
******

सत्याच्या शोधात बाहेर पडतात 
आजही अनेक राजपुत्र 
अनेक धनिक पुत्र 
कुबेर विद्वान सरस्वतीपुत्र 
उच्चविद्याविभूषित 

भोगाच्या अन  भौतिक सुखाच्या 
परमोच्च शिखरावर पोहोचूनही 
परत येतात मागे 
अतृप्ती असमाधान असंतोषाचा 
वन्ही पेटून अंतरात 

होय आजही जन्म घेतात 
महावीर बुद्ध रमण रामकृष्ण व कृष्णमूर्ती
आणि निघतात शोधाच्या त्या वाटेवर 

सारेच पोहोचतात मुक्कामावर 
असे जरी नाही 
पण वाहत राहते ती ऊर्जा 
प्रवाहित होत देह देहांतरात 
कारण उर्जेला कधीच नसते मरण 
अन मग होताच विलय 
घडताच विघटन 
त्या ऊर्जेचे त्या प्रज्ञेचे त्या प्रश्नाचे 
एका महान शून्यात 
गहन ऊर्जेच्या सागरात 
बुद्धाचा जन्म होतो 

अन् हजारो बोधिसत्वांच्या हृदयात 
जागी होते एक अभिलाषा 
आशा मुमुक्षा तितिक्षा 
शक्यतेच्या क्षितिजावर उमटलेली 
स्वप्नाहून सुंदर सत्यता 

गौतमाचा बौद्ध होणे 
असतो एक मानबिंदू 
मनुष्य जीवनासाठी 
संपुर्ण मानव प्रजातीसाठी 
तो असतो विषय
अभिमानाचा आशेचा आस्थेचा  

एक आधार 
त्या शोधकर्त्यांना
एका सार्थ मदतीसाठी,
मार्गदर्शनासाठी

बुद्धत्व ही फक्त एक 
नवी आचारसंहिता नसते 
बंडखोरांसाठी 
ती एक आंतरिक क्रांती असते 
आमूलाग्र बदल घडवणारी 
मानवाचा महामानव घडवणारी
म्हणूनच त्या मानबिंदूचे 
स्मरण नमन अभिनंदन करणे ही 
मानव जातीने कृतज्ञापुर्वक 
करायची  गोष्ट आहे .
नमो बुद्धाय .

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आरसा

आरसा ****** तुझिया डोळ्यांनी मीच मला पाहतो वादळ संवेदनांचे कणाकणात वाहतो  कविता तुझ्यावरच्या  लिहून खुश होतो  मी तुला खुश करतो क...