रविवार, २३ मे, २०२१

निर्गुण साधन.

निर्गुण साधन  
(सोहम साधनेचे काव्यात्मक वर्णन केले आहे.  )
***********

निर्गुण साधनी
कुणा लागे गोडी
घेवु पाहे उडी
तिये पथी ॥१

तरी तया द्यावे 
लागे आलंबन 
ठेवावे आणून 
वाटेवरी ॥२

तयास सुगम
सोहम साधन 
तुटण्या बंधन 
भवाचे या ॥३

स:अहम् मंत्र 
सांगतसे तो मी 
असे आत्मा तो मी
मुळरूपी ॥४

ऐकुनिया मनी
अर्थ तो जाणूनी
सोहं इया ध्यानी  
मग्न व्हावे ॥५

मिळता सद्गुरू 
अनुग्रह घ्यावा
मार्गु हा चालावा 
सांप्रदायी ॥६

परी तयाविन 
अडू नये काही
आत्मदेवा ठायी 
विश्वासावे ॥७

श्वास आत येता
उमटे सो ध्वनी
जाताच निघुनी
हं ऐसा हा .॥८

तयाला लक्षुन
राहावे बसुन 
अंतरात मन 
रोवुनिया ॥९

नाभी ब्रह्मरंध्र
तयाचा प्रवास 
पाही सावकाश 
साक्षेपाने .॥१०

शांत होता चित्त
ठेवी  मस्तकाशी 
जेथे अंकुरासी
येतो अहं ॥११

मी चे ते स्फुरण 
रहावे लक्षून
जाणीवे जडून
ध्यान काळी .॥१२

चालू जाता वाट
वाट पुढे फुटे 
भेटती वाटाडे 
ठायी ठायी ॥१३

किंवा  अंतरात 
पेटताच दीप 
मार्ग आपोआप 
प्रकटेल .॥१४

सांगतो विक्रांत 
स्वानुभवी बोल
गुरूकृपा ओल 
कणोकणी ॥१५


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...