कट्यार
******:
बांधुनिया कटी
बहु मिरवावे
प्रसंगी वधावे
अरी उर ॥
शयनी भोजनी
विना ताटातुटी
घडावी ती प्रीती
ऐसे वाटे ॥
परी म्यानासह
तुज मांडलेले
दिवाणी ठेविले
सजवून ॥
कलाकुसरीने
सूक्ष्म घडविले
वाहव्वाचे झाले
क्षेत्र जणूं ॥
रहा शोभेचीच
अस्पर्श रक्त तू
विसर शस्त्र तू
आहेस हे ॥
तर मग जन्म
कशाला कट्यारी
स्मृतीचिन्हांपरी
मिरवाया ?॥
अवेळीच जन्म
अकर्मीच कर्म
हरवून धर्म
जगणे हे॥
देई सोपवून
ऐश्या कुण्या हाती
न हो धुळ माती
गंजुनिया ॥
आत्मरक्षणाला
वधाया रिपूला
सज्ज हो कटिला
भगिनींच्या॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा