शनिवार, १५ मे, २०२१

जीवन अपघात


जीवन व अपघात
💮💮💮💮
.
जन्मास येतो आपण 
तो असतो एक अपघात 
आपण का जन्मलो 
इथेच का जन्मलो 
असेच का जगलो 
या कुठल्याही प्रश्नाला 
वैज्ञानिक उत्तर नसलेला .

जशी असतात भौतिक जगतात 
बहुतेक प्रश्नांना उत्तरं
अन अपघातांना कारणं 
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत 

जन्मानंतर घडणारी प्रत्येक घटना 
जगण्याचा निरंतर प्रवास 
ती जगण्याची आसक्ती 
ती जिजिविषा 
त्यात असलेल्या 
काळ्याकुट्ट निराशा सकट 
हा सारा प्रवास अकारण असतो 
अकारण दिसतो 

हात पाय तुटून माणसं जगतात 
सरपटत खुरडत चालत राहतात 
मुळे उन्मळून झाडे पडतात 
त्यांच्या पडलेल्या कलेवरांना 
धुमारे फुटतात 
आणि मुळे ही रूजतात कधी कधी 
ती जगत राहतात 
आडव्या बुंध्यातून वर जात 
हा ही एक अपघातच 

आणि मरण !
जन्माला येणे अपघात असेल तर 
मरणे दुसरे काय असणार 
रस्त्यावर गाडीखाली येवून
पाण्यामध्ये बुडून 
वीज अंगावर पडून 
वगैरे वगैरे मरणं 
तर शब्दशः अपघाती मरण असते 

पण वय होऊन 
हृदय बंद पडून 
अवयव निकामी होऊन 
कुठल्याशा अनामिक 
साथीच्या रोगाला बळी पडून 
जे जाणे असते 
तो ही अपघातच असतो
जीवाला जीवना पासून 
तोडून उपटून टाकणारा 

बाकी जीवनातील घटना 
जश्या  शाळेतील ऍडमिशन 
लग्न नोकरी बदली हे सारे 
अपघातच असतात नाही का ?
पुर्वकल्पना नसणारे

असे सारे जीवन अपघातांनी 
वेटाळून टाकलेले दिसते 
कारण 
अकस्मात माहित नसतांना  
कल्पना केली नसताना 
घडणारी
तसेच  फलश्रुतीची वा परिणामाची
शाश्वती नसणारी  घटना 
म्हणजेच अपघात 

इथे त्यांना कोणी 
गोड अपघात म्हणा 
वा कडू अपघात म्हणा 

अन अशी ही 
अपघाताने सुरू झालेली 
अपघातांची मालिका 
अपघातातच संपते 

आपण म्हणतो 
जीवन जगले 
पण जीवन जगले जात नसते 
तर घडले जात असते 
पाण्यात पडलेल्या ओंडक्यासारखे 
पुढे पुढे सरकत 
तटावर धडकत 
कातळावर आपटत 
डोहावर तरंगत वा 
धबधब्यात आपटून फुटत
त्याचे असलेले किंवा नसलेले 
प्रयोजन संपेपर्यंत 

एकदा हे कळले की 
नुसते जगता येते 
आहे त्या जीवनात 
मिळालेल्या प्रवाहवर वाहत 
सुख-दुःखाना तोंड देत 
शांतपणे तरंगत 
कारण
जगणे घटित होत असते
अन ते पाहता येते.


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...