🌸🌸🌸🌸🌸🌸
घालाव्यात
कॉलेजला प्राध्यापकाला
आणि युनिव्हर्सिटीला
पोटभर शिव्या
तसा देवा
मी तुझ्यावर घसरलो होतो
आणि
आश्वासन देणाऱ्या
गुरूच्या घरादाराचा
मठाचा शिकवणूकीचा
परंपरेचा
केला होता उद्धार
होय चुकलंच होतं माझं
पण पूर्णत: नाही
कारण परीक्षा देऊन आलं की
नापास होणार्या
त्या विद्यार्थ्यांनाही आशा असते
पास होण्याची
अकस्मात
चुकून
अपघातानेही
तस तुझ्याकडे येण्यासाठी
गुरुपायी स्थिरावण्यासाठी
कोणती परीक्षा असते
हेही मला माहीत नव्हते .
आणि आपण करतो आहोत तो
अभ्यास आहे की परीक्षा आहे
हेही कळत नव्हते.
पण तरीही आपण कुठेच नाही
हे जाणवत होते
किंबहुना आपली
अडलेली अडकलेली
गती डाचत होती.
मुळात आपण
सुरुवात केली आहे की नाही
वा कुठल्या गाडीत आहोत की नाही
तेही माहित नव्हतं
थोडक्यात आपल्या मनासारख
काहीच होत नाही हे पाहून
अथवा बरोबरीच्या लोकांची
होत असलेली
तथाकथित प्रगती पाहून
ईर्षेने जळून जाऊन
केलेली प्रार्थना
फळत नाही हे बघून
मनात उमटलेला संताप
आला असावा उफाळून.
काय असेल ते असो
पण दोर तुटलेल्या
कोंडाण्याच्या कड्यावर
उभ्या असलेल्या
मावळ्या सारखी
माझी स्थिती झाली होती
मेलेला तानाजी हि मीच होतो
चिडलेला सूर्याजीही मीच होतो
आणि अडलेला मावळाही मी होतो
आता लढण्या शिवाय
दुसरा मार्गच नव्हता
मग पुन्हा तलवार उपसली
पुन्हा स्तोत्र उमटली
पुन्हा जपमाळ घेतली
ढाल पुढे सरसावली
हरहर महादेवाची गर्जना केली
आवळून तुला साद घातली
पण एवढं नक्की की
आता लढाई खूपच बदलली होती.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा