लेखणी
******
कुणी म्हणे शस्त्र
कुणी वा लेखणी
धन्य खरोखर
तियेची करणी ॥
कधी हळुवार
होत अलवार
ओघळते आत
होऊन पाझर ॥
कधी होते आग
तोफ तोंडागत
येई त्या समोर
राहते जाळत ॥
कधी होउनिया
मुग्ध प्रेम गीत
देई उमलून
हृदयी वसंत ॥
मायेच्या वात्सली
कधी ओसंडते
सुखाचा सागर
उरात भरते ॥
जितुकी जे भाव
तितुके ते रूप
आणिक अरूप
रूपी दाखविते ॥
विक्रांत सदैव
तियेचा तो ऋणी
अक्षर सृष्टीचे
दान हे घेऊनी ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा