सोमवार, ३ मे, २०२१

झपाटणे


झपाटणे
*******

माना तुम्ही वा मानू नका 
पण एक खरे असते 
कधीतरी तुमच्याही मागे 
एक पिशाच्च लागते 

बाभळीच्या झुडुपामधून 
चिंचेच्या वा झाडावरून 
तुमच्या जीवनात 
उगाचच डोकावते 

तुमच्याकडे नसतो मंत्र 
पळविण्याचे अथवा तंत्र 
मग तुम्हीच पळत सुटता 
भुताला त्या टाळू पाहता 

पण भूत हे तर भुतच असते 
पछाडणे त्याच्या 
स्वभावातच असते 
पण दोष तुमचाच असतो 
तुम्हीच कधीकाळी 
कुठल्यातरी संध्याकाळी 
गेला होतात ओढ्या जवळी 
अथवा कुण्या अवेळी 
चिंचेच्या त्या झाडाखाली 
बसला म्हणत व्याकूळ गाणी 
त्या क्षणी कळल्यावाचूनी
तुम्हा पाहिले असते कोणी 
मागे वळूनी  जाणल्यावाचुनि
तुम्ही बसता स्मित देऊनी 

वाऱ्याच्या लहरीवरी 
मोगऱ्याचा गंध येतो 
हवेमध्ये हलकेच
हिरवा चुडा खणखणतो

ते हसणे मग होते दुखणे 
ते गाणे मग होते मरणे 
कदाचित त्या भुतालाही 
त्याचे भूतपण ठाऊक नसते 
वार्‍याच्या लहरी वरती 
उगाच तरंगणे कळत नसते 

तुम्हाला भुताने झपाटणे 
तुमचे भुतापुढे हतबल होणे 
काहीतरी विचित्र घडते 
एक कविता भणभणती 
जन्मभर त्रास देते


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साईनाथ

साई नाथ ******** असूनी मातीचा जन्म हा धुळीचा केला आकाशीचा  मेघ मज॥१ तयाच्या कृपेचा प्रसाद मिळाला धन्य हा जाहला जन्म इथे ॥२ नसूनह...