रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

पसारा

पसारा 
******
म्हणतो जाईल मी हा सोडूनिया पसारा 
पण काय भोवताली जमेल नवा पसारा 

या फांद्या जीवनाच्या का जीवनास आटोपेना
व्यापूनिया आसमंत दिसतो सर्व पसारा 

जी हवी ती दिशा या वृक्षास सापडेना 
अडवतो प्रकाशास घनदाट तो पसारा 

हाती न येती चांदणे पसरून दोन्ही करा 
जे भेटते न कधी ते असते काय पसारा 

ओझे हवे पणाचे हे उपजे कुण्या मातीत
उगवून मातीतून जातो मातीत पसारा 

जो उधळतो फुले तो असे काय फुलांचा
तो रंगही जीवनाचा होतोच ना पसारा 

होतोच जन्म शेवटी  हा कोपऱ्यात पसारा
विचारतो कुणी काय कुठे गेला रे पसारा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

जाणे

जाणे
*****
तुझे आकाशाचे नाते 
तुज कळत का नाही 
तुझे धरित्रीचे मूळ 
तुज दिसत का नाही ॥

नादी लागून वाऱ्याच्या 
भरकटतो सारखा 
जग घालून जन्माला 
का रे त्यात तू परका ॥

लाख सवंगडी तरी 
जन्म विराण एकटा 
हात सोडवून दूर 
नेती प्रवाहाच्या वाटा ॥

जन्मा आधीचा एकांत 
गुज सांगतो कानात 
झाले खेळणे बहुत 
येणे परत घरात ॥

रंग अवधूत तोच
वाट पाहतो शून्यात 
गजबजाट जगाचा 
आता हरपो वाऱ्यात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

काय असे ते

काय असे ते
*********
देहात वाहते मी पणे नांदते 
तुजला कळते रे काय असे ते ॥

भ्रमात जगते मोहात फसते 
मिटून ही जाते रे काय असे ते ॥

दुःखाच्या डोहात आशेच्या लाटात
स्वतःला शोधते रे काय असते ते ॥

कळल्या वाचून जीवन चालते 
तयाला पाहते रे काय असे ते ॥

जळल्या वाचून ज्योत जी पेटते 
तयात जळते रे काय असे ते ॥

विक्रांत शोधतो सर्वत्र धावतो 
निवांत राहतो रे काय असते ते ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, १२ नोव्हेंबर, २०२५

जगत

जगत
******
माझिया मनात घडो तुझा वास 
सरो जड भास जगताचा ॥

माझिया कानात पडो तुझे शब्द 
नको व्यर्थ वाद जगताचे ॥ .

माझिया स्मरणी राहा निरंतर 
घडू दे वावर मग जगी ॥

अगा हे जगत मनाचे वर्तुळ 
घडावा समूळ नाश याचा ॥

विक्रांत फिरला जगी भवंडला 
तुज कळवळा येवो दत्ता ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

किन्नर(अनुवाद)

 


किन्नर(अनुवाद)

*****

कुणी म्हणतात  

ते आळशी असतात पुरुषागत

अथवा शोषित स्त्रीयांगत

आरसा पाहून हरखून जातात 

पण जिवलग मरताच ते

दु:खात डूबतात 

अन डोळ्यात त्यांच्या चमकतात 

तीच सुखाचे आसवे प्रेम मिळताच

दिलदार असतात ते

अन व्यवहारीही


किन्नर वेगळे असतात 

असे कुणी म्हणतात

पण लुटारू तर 

त्यांनाही ठार मारतात
.

(कवि ब्रज श्रीवास्तव)

अनुवादक डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 

 

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

ती भेटली .

ती भेटली
*******

ती भेटली बोलली 
तशीच मुग्ध हसली
नच खंत वा सांत्वना 
कुठे शब्दात उमटली 

चार पाच विषयात 
सरे बोलणे मिनिटात 
ती होती सहजताच 
उमटली वाऱ्यात 

एक दरवळ तरीही 
दाटला मनात 
चांदण्याची मंद 
अन् झाली बरसात 

तपाचा जरी की
दुरावा काळात 
मैत्र मनातील 
उजळले मनात

बरे येते भेटू पुन्हा
वदली उगा शब्दात
नव्हते वचन किंवा 
अपेक्षा निरोपात 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .




निरोप

निरोप
*****

निरोप या घटनेला कितीतरी पैलू आणि छटा आहेत.
जसा की प्रेयसी व प्रियकराने  घेतलेला निरोप , 
हा निरोप कधीकधी त्या दिवसा पुरताच असतो . पण त्यात दुसऱ्या दिवशी भेटायची ओढ असते, आश्वासन असते. 
तर कधी प्रेमाच्या शेवटच्या टप्प्यात मिलन अशक्य ठरल्याने ,एक शेवटचा निरोप ही घ्यावा लागतो. त्यात असहायता असते.द्विधा मनस्थिती असते, कर्तव्याचे भान असते.

आई  बाप जेव्हा मुलगी सासरी जातांना तिला निरोप देतात त्या निरोपात व्यथा असते . तळहाताच्या फोडा सारखी जपलेली मुलगी दुसऱ्याच्या घरात पाठवतांना होणारी कालवा कालव आणि तिच्या भविष्यातील सुखा बद्दल आशा अन् काहीशी चिंता यांचे ते संमिश्र भावना कल्लोळ असते. 
 
युद्धावर लढायला जाणारा सैनिक ज्या वेळेला आपल्या पत्नीचा, आई-वडिलांचा आणि मुलांचा निरोप घेतो, त्यावेळेला त्या निरोपात एक भय असते की कदाचित आपण यांना पुन्हा पाहू शकणार नाही .त्यामुळे त्या निरोपात एक विलक्षण आर्तता असते. 

नवविवाहित पत्नी माहेरी जाताना  तिला
दिला जातो निरोप त्यात एक वेगळाच रंग असतो.

गावावरून येताना वृद्ध आजी-आजोबांचा निरोप घेतानाही तीच व्याकुळता मनात दाटून येते .

निरोप कधी तात्पुरता असतो तर कधी कायमचा शेवटचा असतो.

प्राणप्रिय जीवलगांच्या महायात्रेत सामील होतांना आणि त्या यात्रेची सांगता करताना घडणारा निरोप काळजात व्रण उमटवणारा असतो .

तर कधी आषाढी संपल्यावर पंढरपूरचा निरोप घेताना वा ज्ञानदेवांच्या समाधी मंदिरातून बाहेर पडताना किंवा गिरनारच्या शेवटच्या पायरीवर माथा टेकवताना अथवा पाच दहा दिवस घरात राहिलेल्या गणपती  बाप्पाला विसर्जनासाठी नेतांना उरात होणारा  तो कालवा त्या निरोपाला काय नाव द्यावे कळत नाही.

काही निरोप शब्दात उतरतात काही डोळ्यात तर काही मनात .तर कधी निरोप घ्यायचा राहूनही जातो अन् ती खंत उरी डाचत राहते.

निसर्गात तर हि निरोप व भेटण्याची शृंखला अविरत त्याच उत्कटतेने घडतांना दिसते संध्याकाळच्या सूर्याचा निरोप , पहाटे पहाटे चंद्राचा निरोप,  वर्षा ऋतू सरता सरता मेघांनी घेतलेला निरोप, 

ज्या निरोपात आपले अस्तित्व थरथरते ,आत काहीतरी हलते तो निरोप खऱ्या अर्थाने निरोप असतो अन्यथा ते गुडबाय ,हात रिवाजी हलणे असते.

विक्रांत तिकोणे 

डॉ. मनीष दोशी Dy MS (I/C)राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त)

डॉ. मनीष दोशी Dy M.S.(I/C) राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त) ***************** खरे जे डॉ .मनीषला ओळखतात  त्यांना सांगायची ...