शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

चारोळ्यांची कविता

चारोळ्यांची कविता 
********
मारुनी लाख चकरा पाय जरी दुखले रे 
लायकी वाचून कुणा काय इथे भेटले रे 

भक्ता वाचून देवालया अर्थ काय उरले रे 
भक्ता वाचून देवाचे अन् काय इथे अडले रे

लाख डोळ्यात कुणा साठवून काय होते रे 
वाहतात अश्रू जेव्हा स्मृतीं खोल खचते रे 

सारीच स्वप्न साऱ्यांची तशीच असतात रे
चाकोरीत व्यवहारी सर्व हरवून जातात रे 

जगणे म्हणजे शाप कुणी ते म्हणतात रे 
जगण्याला घट्ट तेच पकडूनी राहतात रे 

चारोळ्यांची कविता ही कविताही नसू दे रे 
वाचायची कुणालाही बळजबरी नाही रे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

प्रवास

प्रवास
*****
ही वाट तीच आहे मी ही तोच आहे 
चाकावर गतीच्या रस्ता वाहत आहे 

ती स्वप्न हलकीशी मनात जागलेली 
थांब्यावर कुठल्या उगाच तिष्ठत आहे

नकळे कुण्या वळणावर काय गोंदलेले
अजुनी का गंध ते मनी  रेंगाळत आहे

तेव्हा या पथावर खाच खळगे नसावेत 
आता मात्र हादरे हादऱ्यावर बसत आहे 

होतो कधी ब्रेक जाम कधी टायर पंक्चर  
नसणे तुझे जीवनात गतीला सलत आहे 

प्रयोजन प्रवासाचे आता जरी उरले नाही 
रस्त्याचे व्यसन तरीही उगा वाहवत आहे 

कळते हे वाहणे रे आता निरर्थक आहे 
जाणतो अन् प्रवासाला प्रत्येक अंत आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

अटळ

अटळ
****
गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची 
ती कृती भ्याड नामर्द रात्रीची 
अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची 
ती कृती उद्दाम  द्वाड दिवसाची
कसा काय धर्म कळणार तयाला 
दृष्टी जी न पाहते कधी सौंदर्याला 
ती मुद्रा शांत प्रशांत गौतमाची 
नभातील नितळ शुभ्र प्रकाशाची 
ते हास्य कोमल प्रेमळ गोरखाचे 
चांदणे ओघळले जणू पौर्णिमेचे 
कसा द्वेष नांदतो कुठल्या नसात 
काय जन्म वाहतो कुणाचा विषात 
तया सत्य प्रेम काहीच कळेना 
जणू जन्मा आली पुन्हा दानवसेना 
जया हाती शस्त्र येते आततायी 
तया गत रावणाची रे अन्य नाही 
भरले अपराध भरले रे शंभर
अटळ आता अटळ आहे रे संहार

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

अलिबाबाची गुहा

अलिबाबाची गुहा
*************

ती गुहा अलिबाबाची दिसते कधी पुन्हा 
शब्द परवलीचे पण नच बोलतो मी पुन्हा 

तेव्हाही ती परवल चुकलीच होती जरा 
उघडल्या वाचून दार गेलो होतो माघारा 

यदा कदाचित संधी मिळाली ही असती
ठेच अहंकाराला पण फार लागली होती 

विसरले स्वप्न ते आणि मार्ग धोपट धरला 
प्रत्येक डाव हातातला का नकळे मी टाकला 

आता व्यथा न अंतरात पण चुका त्या हसतात 
हरवल्या सिंधुत शिंप्या काय पुन्हा मिळतात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

रिक्तहस्त


रिक्तहस्त
********
रिक्तहस्त जीवनाची 
खंत ही मिटत नाही 
अंतर्बाह्य कोंडणारा 
एकांत सरत नाही 

दिलेस तर मिळेल 
सुखाची ही धूर्त अट 
करताना पुरी इथे 
आले आयुष्य संपत 

काय हवे होते तुला 
आणि काय आहे हाती 
कुठे सुरू झाली असे 
कळेना ही विसंगती 

कोण तुज चालवतो 
नेऊनिया आड वाटा 
कोण तुज थांबवतो 
अडवून वहीवाटा 

थांबवावा वाटतो हा
उगा रेंगाळला खेळ
अर्थहीन वाटते ही 
वाहणारी नित्य वेळ

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

माई

माई
****
माझ्या व्याकूळ प्राणात 
फक्त तुझे गीत आहे 
बोलाव ग आता तरी 
प्रेम तुझी रीत आहे 

आलो होतो एकदा मी 
धाडलेस तू माघारी 
ती व्यथा नकाराची नि 
शिक्का असे माथ्यावरी

इथे यश अपयश 
असे काही नसे जरी 
आल्या विन प्राप्त घडी 
काही होत नाही परी 

कालातीत तू कालौघी 
माझी सरू आली वारी
म्हणूनिया माई माझे
हुरहूर दाटे उरी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .



बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

डीजे

डिजे 
****
बारा वाजू आले डोळे जड झाले 
पिसाटले ध्वनी जिणे जड झाले

कर्कश्य आवाज भरला जगात
पैसा फेकुनिया मुले नाचतात 

ही झिंग नृत्याची ही ओढ सुखाची 
दिशाहीन धाव फाटल्या मनाची 

चाले गदारोळ कर्कश्य संगीत
बधिरला मेंदू व्यर्थ उन्मादात  

कसली ही भक्ती देवाच्या रे दारी 
ही नच संस्कृती अगा ही विकृती 

आधी दहा दिन कान फाटलेले 
आता ह्या डिजेने प्राण उसवले 

कुठे हा चालला कळेना प्रवास 
धर्म नावाखाली चालला हैदोस 

वाटते तो बरा होता रे कोरोना 
शांति काठोकाठ भरली जीवना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...