सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

वाचून

वाचून
****
पडे ना उजेड 
जळल्या वाचून   
मुर्ती ना आकारे 
तासल्या वाचून ॥

घडेना मडके  
भाजल्यावाचून
बीजा ना वृक्षत्व 
फुटल्यावाचून ॥

करी रे साधन 
अवघे अर्पून
साध्य काही ते
तरीच होईन॥

काही न मिळते
पेरल्या वाचून 
जल का कुणास 
खणल्या वाचून ॥

मागता मिळते 
शोधता दिसते 
स्वये हरविता
काही सापडते ॥

सांगतो संताचे 
काही न मनीचे
जैसे मी पाहीले
बोल हे कृपेचे॥

विक्रांत रमला 
कष्टात हासला
सुख आकळून
सांगतो सकळा॥

*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

ध्वनी

ध्वनी
*****

सोहमचा ध्वनी 
आत उमटता 
वृतीला पडता 
 दडा जेव्हा॥

तया त्या शून्यात 
उरतो एकांत 
पाहणारा आत 
लीन होतो ॥

शब्दांविण शब्द 
मनाला धरून 
जाय उतरून 
मनापार ॥

तेथे तो बहिरा 
होत असे खरा 
मातृकांच्या परा 
जाऊ शके ॥

विक्रांता सहज 
असतो कठीण 
माय बापाविण 
जन्म असा ॥

*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com
++++++

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

एकाकार वृति

एकाकार वृती
**********
एकाकार वृत्ती 
असो लक्ष्यावर 
जगाचा विसर 
पडो मग ॥

एकच ते ध्यान 
घडावे स्मरण 
एकच रे गाणं 
मनी वाजो॥

जया हवे जे ते
मिळते रे खास 
म्हणूनिया ध्यास 
सोडू नको ॥

तिथे राही स्वस्थ
हालचाली विन 
भासता कंपन
सांडूनिया ॥

माझे ते मीपण 
येवो अंकुरून
घडे ते घडणं 
घडू द्यावे ॥

विक्रांत रमला 
एकांती बसला 
तरंग मिटला 
पाणियाचा ॥

*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

झुम मिटींग


झूम मीटिंग 
*****
भले मोठे ओझे जणू 
घेउनिया पाठीवर 
जेव्हा येतो साहेब तो
झूमच्या  मीटिंगवर 

आम्ही आपले श्रोतेच 
हु की चू बोलत नाही 
बोलता छडी मिळते 
जाणूनिया असू काही 

तसा तर माईक ही 
आपला बंद असतो 
कॅमेरात चेहराही 
कोणी पाहत नसतो 

बोलणारे फक्त चार
चर्चेस वाव नसतो 
हुकुमाचे ताबेदार 
खरंच होयबा असतो 

पण ते बोलती छान 
अधिकारी शब्द ज्ञान 
आम्ही होतं कृतकृत्य 
हलवितो फक्त मान 

वर काय चालले ते 
नीट जरा कळू येते 
नोकरी सांभाळण्याचे 
कसब अंगी बाणते 

एक या झुमचे पण 
खरंच बरे असते 
पुच्छ हलवत उगा
नच पळावे  लागते 
*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

कल्पद्रुमा

कल्पद्रुमा
***
मज दत्तराया 
छळते ही काया
जन्म जाई वाया 
तुजविन ॥

जैसे रक्षिलेस 
मच्छिंद्र गोरक्षा
तैसा मज रक्षा
भगवंता ॥

जैसे प्रेम दिले 
जालिंदर कानिफा
तैसे प्रेमे पहा 
दयाघना ॥

कैसे है जगणे 
कैसे ही मरणे 
वावुगे फिरणे 
जन्मातून ॥

येऊनिया नाथ 
करा हो सनाथ
पाही दिनरात 
वाट तुझी ॥

विक्रांत दत्ताचा 
म्हणवितो साचा 
सार्थ करी वाचा 
कल्पद्रुमा ॥

******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

खुण

खुण.
****
मंद चाफ्याचा सुगंध 
तनामनाला व्यापतो 
दत्त गिरनारी मज 
प्रेमे मिठीमध्ये घेतो ॥

व्यापे आकाश धरती 
कण कणात भिनतो 
मज दावुनिया खुणा 
वर चढण्या सांगतो ॥

दत्ते स्वीकारले मला 
खूण पटली मनाला 
मनी आनंद कल्लोळ 
माय कृष्णाई डोळ्याला ॥

सरो बंधने उरली 
ठेवी ठेवी रे पदाला 
वदे विक्रांत कृपाळा 
करी निसंग मजला ॥

****
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com
***

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

दत्ताचे घर

दत्ताचे घर!
**********
माझिया दत्ताचे 
घर किती न्यारें
चंद्र सूर्य तारे 
छपराला ॥
माझिया दत्ताचे 
दार किती न्यारे 
जगताचे वारे 
वाहे त्यात ॥
माझिया दत्ताचे 
अंगण विश्वाचे 
आकाशगंगेचे 
विलक्षण ॥
माझिया दत्ताच्या
 गूढ माळ्यावर 
अद्भूत विवर
कृष्णमेघी ॥
 माझेया दत्ताच्या 
रंग तो भिंतीचा 
नित्य नाविन्याचा
 क्षणोक्षणी ॥
 दत्ताच्या घरात 
दत्ताला शोधत 
राहतो फिरत 
तरीसुद्धा ॥

*****
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...