गुरुवार, २५ जानेवारी, २०२४

घडो स्मित

घडो स्मित
********
तुझा राम तुझ्यासाठी राहू दे समर्थ ओठी
जाणतो स्मरण अन्य तुझ्यासाठी आडकाठी ॥१

अगा कोडे जीवनाचे कोणा कसे उलगडे 
परी खरे वाटते हे कुण्या जन्मी होते नाते ॥२

तत्व किती पुरातन वाहते हे जन्मातून 
भेटूनिया पुन्हा पुन्हा जाते पुन्हा हरवून ॥३

एक पुन्हा ताटातूट जरी दिसे डोळियांना 
साद घाली कोणीतरी अनादी या प्रेरणांना ॥४

ओंजळीत कधी वाटे तुझे तप्त दुःख घ्यावे 
परी तुझे निग्रहाचे हात कैसे उघडावे ॥५

अन् भिती मनी एक नको पुन्हा दुरावणे
उभा तुझ्या अंगणात घडो स्मित देणे घेणे ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...