शनिवार, २० जानेवारी, २०२४

निरोप

निरोप
*****

एक निरोप सुंदर असा
देता यावा जीवनाला 
हलकेच आपण प्रवाहात 
जसे सोडतो दिव्याला  ॥१

देह सुटावा मन सुटावे 
रंग सुटावा एकेक लागला 
उठल्यावाचून ओरखडा
देठ सुटावा फांदीत गुंतला ॥२

सुंदरशा या जीवनाला 
गालबोट का लावावे
सुकल्या वाचून सुमन 
हळुवार भूमीस मिळावे ॥३

अवघा गंध आकाशात 
मंद धुंद भरून राहावा
आणि हरेक अंकुराला 
निर्माल्याचा हेवा वाटावा ॥४

कधी उमटली अन हरवली
ठाव लहरींचा नाही सलीली
तद्वत आली आणिक गेली 
गोष्ट घडावी क्षणात सजली ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुत्रशोक

पुत्रशोक  ( डॉ. हरेश मंगलानी सरांच्या मुलाच्या, डॉ. रौनकच्या आकस्मक निधनाने उमटलेली  व्यथा) ******* मुलाचे पार्थिव खांद्यावर वाह...