रविवार, २१ जानेवारी, २०२४

मानव्य


मानव्य
*******
अवघे जरी की एकाच भूमीचे 
एकाच जलाचे वृक्ष थोर  ॥१
तू झाला हिरवा हा झाला पांढरा 
आणिक तो निळा ऋतूमाने ॥२
एक एका वैरी एक एका भारी 
होत दांडयापरी कुऱ्हाडीच्या ॥३
पाहता पेशीत एक गुणसूत्र 
पूर्वजांचे चित्र एकच ते ॥४
कोणी कोणा शस्त्रे असे बाटवले 
कोणी पळविले धन बळे ॥५
भरला मेंदूत तोच धर्म तुझा 
दुश्मन तो दुजा वाटे मग ॥६
काय पुन्हा एक होईल मानव 
धर्म जात शीव ओलांडून ॥७
सुटल्या वाचूनी हा प्रश्न अनुत्तरीत
थांबवितो हात लिहितांना ॥८
नकाराच्या लाटा कानी घोंगावती
सज्ज हो म्हणती रक्षणाला ॥९
स्वजन आघवे पाहून मना ते
भय बहू दाटे पुनरपी ॥१०
काळाचा हा प्रश्न सोडविल काळ 
दयाळा सांभाळ मानव्याला ॥१२

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नशीब( उपक्रमासाठी)

नशीब   (उपक्रमासाठी  ) ******* घडणाऱ्या घटनांचा अर्थ कळत नाही  क्रम उमजत नाही  कारण मीमांसा कळत नाही  बोल कुणाला देता येत नाही  ...