सोमवार, ४ मार्च, २०२४

वादळ


वादळ
*******

होय डमडम भरल्या नभात
क्षणोक्षणी पिशी वीज चकाकत 

भरले वादळ लाटा आकाशात 
नव्या नाविकाची होय होलपट

कोण सांभाळतो कुणास कळेना 
वेढून काळोख अवघ्या दिशांना

कुठे.दूरवर दिसतो किरण
असावा भास का जीवन तारण 

काळ हिशोब हा कुणा रे कळला 
हातात क्षण हा आला का गेला
  
खोल खोल असे तळ तो अतळ 
 निस्पंद निष्क्रीय अस्तित्व केवळ

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, ३ मार्च, २०२४

स्वामी गजानन


स्वामी गजानना 
*************
दत्त अवधूता स्वामी गजानना 
करीसी करुणा भक्तावरी ॥१
देसी भजकांना मनातील सारे 
सौख्याची ती द्वारे उघडशी ॥२
परि भक्ती उणा उभा मी अंगणा 
तुज मागतांना लाज वाटे  ॥३
असुनी जन्माचा भणंग भिकारी 
तुझे पाय शिरी मागतो मी ॥४
केल्याविन पूजा स्मरण नमन 
स्वानंद भुवन मागतो मी ॥५
केल्याविना ग्रंथ तव पारायण 
भक्तीचे जीवन मागतो मी ॥६
देही मिरवतो संसार बंधन 
मुक्तीचे मागणं मागतो मी ॥७
दत्त माझा नाथ तो तू अवधूत 
असे भेदातीत स्वरूप हे ॥८
म्हणूनिया काही प्रेम हक्क सांगे 
तुज लागी मागे प्रेम तुझे ॥९
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

तथ्य


तथ्य
****
थांबलेला श्वास विरलेला स्वेद 
जगताचा भेद मावळला ॥१

कागदाची गत जैसी वादळात 
तसे रे अस्तित्व हरवले ॥२

पेल्यातला रंग सांडावा नदीत
तैसे समग्रात मन जाई ॥३

कणकण जणू होतं विघटीत 
देहाचे गणित कळू ये ना ॥४

सारे अट्टाहास उगा असण्याचे 
आजचे उद्याचे व्यर्थ झाले ll ५

आले स्वप्नभान जगता स्वप्नात 
निद्रा जागृतीत भेद नाही ॥६

दिसते म्हणून असते जगत 
तथ्य दिसण्यात अन्य नाही ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 

शुक्रवार, १ मार्च, २०२४

जातेस तू

 जातेस समोरून
*************
तू जातेस समोरून अन
श्रावणातील घननिळा मेघ 
घेतो मला लपेटून 
ती शामलता जाते 
माझा कणकण रंगवून
माझ्या अणूरेणूतून 
गहन यमुना होऊन 

कळत नसते तुला 
प्रत्येक तृणाचे आसुसलेपण 
दिसत नसते तुला
हात उभारून फडफडणारे
वृक्षावरील प्रत्येक पान 

जेव्हा झंकारून उठते 
तुझे नाव प्रत्येक पेशीतून 
स्थळकाळ जातात हरवून
उरते फक्त तुझेच गुंजन 

डोळे पाहत असतात 
तुला पाहून न पाहून 
दुराव्याच्या धूसर काचेतून 
ठेवतात कैद करून 
तुला न दिसणारे 
तुझे प्रतिबिंब होवून 

तरीही जातेस तू
पुन्हा पुन्हा निसटून 
फक्त एक सावळे
आषाढ स्वप्न देऊन 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .
 

डॉक्टर शांताराम कवडे

 
स्व .डॉ शांताराम कवडे( श्रद्धांजली)
******************
भेटायच्या खूप वर्ष आधी नावाने 
आणि मग नंतर सहवासाने 
परिचित झालेला हा माणूस 

काही कथा आणि काही उपकथा त्यांच्या 
पडायच्या कानावर अन उमटायचे मनावर 
एक चित्र हरफनमौला बिनधास्त व्यक्तिमत्त्वाचे 

या सुखावर या जगावरया लोकांवर 
प्रेम करणारे मस्तीत  जगणारे
मौजेची आणि मस्तीची साधन जमवणारे
एक जीवन इच्छेने रसरसलेलं व्यक्तिमत्व 

मग पडली कानी त्याच्या दुर्धर व्याधीची कहाणी
खोटी असावी वाटत असूनही खरी ठरली 
जायचे वय नव्हते अन जायचे कारणही नव्हते 
परंतु दैवाने ठरवलेले आयुष्याचे श्वास संपले होते 
वाट्याला मोजून आलेले क्षण उरले नव्हते 
उधाणाला भिडलेले शिड तुटले होते 

तरीही ओठावर ती जिगर तशीच होती 
ओठावरच्या मिशागत पिळ देत लढा देत होती

अकाली आलेल्या सुचनेने जरी 
स्वरात संकटाची धग  जाणवत होती 
पण आवाजात डोळ्यात रग  दिसत होती
ढाल तुटलेल्या तानाजीची ती दुर्दम्य तडफ होती 
निर्णयाविना जिंकायची ती सिद्धता होती

खोल कोपऱ्यात डोळ्यांच्या  किनारीला शब्दाच्या 
आवाजात रुद्ध होणाऱ्याअज्ञाताची भीतीही होती 
शब्दावरून सारे कळत होते 
खरच ते सारे पाहायचें मनाचे धाडस होत नव्हते 

व्यर्थ प्रार्थनेचे पडसाद तरीही मनातून येत होते 
चमत्कार घडत नसूनही मन ते इच्छित होते 
चमत्कार घडला नाही अन सोबत असणारे 
एक उमदे व्यक्तिमत्व आमच्यात आता नाही
हे स्वीकारणे मनाला भाग पडत आहे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४

आमरे


ओ टू आमरे
*********
 ज्याच्या शब्दात श्वासात 
आणि देहबोलीत 
मराठीपण मुरलेले आहे
ज्याला व्यक्तीमत्वाला 
प्रामाणिकतेचा स्पर्श आहे 
ज्याचा साधेपणा अस्सल आहे
असा माणूस म्हणजे आमरे आहे .

बहुतांशी मराठी माणसाला
धूर्तपणा कावेबाजपणा जमत नाही
तसा त्यालाही जमत नाही
स्पष्टता  सरळता सडेतोडपणा 
त्याच्यात अधोरेखीत आहे .
खरतर तो उत्तम स्वभावाचा ठसा आहे
असा माणूस म्हणजे आमरे आहे .

त्याचा प्रामाणिकपणा कामसूपणा 
सदैव दृष्टीस पडतो 
जो वरिष्ठांना सदैव प्रिय असतो
असा माणूस म्हणजे आमरे आहे

माझ्या फोनच्या डायरीमध्ये 
आमरे यांचे नाव ओटू आमरे असे आहे 
कारण ते  त्यावेळेला ओटूची 
सर्व जबाबदारी  पाहत होते 
आणि नंतर ते ऑफिसमध्ये शिफ्ट झाले 
पण मी त्यांचे ते ओटूं आमरे 
हे नाव तसेच ठेवले 

खरंच सांगतो ऑफिसला पण 
ओटू देणारे ते 02 आमरेच होते 
प्राणवायू हा शरीरात फिरणारा 
शरीराच्या कानाकोपऱ्यात जाऊन 
प्रत्येक पेशी पर्यंत पोचून उर्जा देणारा 
जीवनाचा अत्यावश्यक घटक आहे

 तसेच आमरे सुद्धा ऑफिस 
स्टोअरमधील प्रत्येक कपाटात
प्रत्येक वळचणीत जाऊन
प्रत्येक जागेत कोठे काय आहे 
ते शोधून काढून आणून देतात .
म्हणूनच माझ्या दृष्टीने आमरे
ऑफिसचे ओटू होते

आमरेचे चहा पाणी व 
खाण्यापिण्यावरील प्रेम जगजाहीर आहे 
आणि असे प्रेम असणारी माणसे 
स्वतःवर आणि जगावर ही 
तेवढेच प्रेम करू शकतात 

कारण स्वतःला आनंदी ठेवले
 तरच तुम्ही जगाला आनंदी ठेवू शकता 
आमरे स्वतःच्या चाकोरीत 
चाकोरी न सोडता परफेक्ट 
काम करत होते 
त्यांनी परफेक्ट नोकरी केली 
आणि सर्वांना मदत करत 
सगळ्यांशी स्नेहसंपादन करत 
सदैव हसमुख राहिले 
खरच हा माणूस म्हणजे एक 
परफेक्ट कामगार होता 

आणि परफेक्ट कामगाराचं निवृत्त होणे
हे प्रशासनाचा तोटा असतो 
परंतु 34 वर्ष नोकरी केल्यावरती 
निवृत्तीचे समाधानाचे आयुष्य जगणे 
हा त्यांचा हक्क ही आहे 
म्हणून आम्ही सर्व त्यांना 
अगदी मनापासून 
त्यांच्या भविष्यातील निवृत्ती पश्चात 
आयुष्यासाठी
आरोग्याची आनंदाची 
भरभराटीची संपन्नतेची 
शुभेच्छा देत आहोत 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

विलोपण

विलोपण

******
पुनव येते अन् चंद्रही असतो 
पण तो भेटतोच असे नाही
आषाढ येतो वर्षाही असते 
पण तो भिजवतोच असे नाही 

अन् तरीही पुनवेची ओढ 
आपली कधीच मिटत नाही
प्राणातील ओढ अनिवार 
भिजणे नको  म्हणत नाही

हि ओढ आदिम या रक्तातली
असते  जाळत तनमन अन
शोधत असते प्रत्येक जीवन 
पुन पुन्हा एक आत्मविलोपन

कधी पावसाच्या मिठीत 
कधी चांदण्याच्या दिठीत 
कधी कस्तुरीच्या उटीत
कधी श्वासातल्या गतीत 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 



 






आसावरी ताई श्रद्धांजली

रंग *** ( आसावरीताई काकडे ) रंग रेषा आणि शब्द  यात जीवा गुंतवूनी  एक निर्मळ आयुष्य  जगली ती मनस्विनी  खिडकीतील इवली तीच फुले आणि...