शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

दत्त रिक्त

दत्त रिक्त
********
दत्त भूत विसरला दत्त भविष्य नसला 
दत्त अस्तित्व होऊन याचं क्षणात साठला 

दत्त नाठवे मनाला दत्त नाठवे तनाला 
दत्त संस्कार जंजाळ दूर सोडुनिया आला 

दत्त रिक्त अस्तित्वात फक्त एकटा उरला 
मी तो आहे रे इथेच शब्द सोडून वदला 

आहे पणात थांबला ओघ काळाचा नसला 
दत्त जाणीव सतत दिवा पेटवून गेला 

नाव ओढून विक्रांत नांदे व्यर्थ जगताला 
मित्र जीवलग प्रभू आणू पाहतो शुद्धीला 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘o☘l☘d☘1☘20

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

दुवा

दुवा
****

तुझ्या डोळ्यातील दुःख 
माझ्या कविता होतात 
तुला हास मी सांगतो 
कळा हृदयी येतात 

तुझ्या ठाऊक न कथा 
तुझ्या ठाऊक न व्यथा
मना व्यथित करिती 
खिन्न विषण्ण त्या छटा 

नको सांगूस तू काही 
मी ही विचारत नाही 
दुःख वाटावे  वाटता
साद घालुनिया पाही 

रंग उधळले तुझे
स्वप्न होऊ देत खरे
अन जाऊ दे पांगले
मेघ अकाली दाटले

शब्द काजळा दडले
तुझ्यासाठी मी लिहिले
तुज ठाव जरी नाही
लाख दुव्यांनी भरले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

झाड


झाड
*****
असे एकटे बसणे निराधार असणे 
कुठल्याही जीवाला आवडत नाही 
स्पर्शाशिवाय आपले अस्तित्व 
आपल्यालाच खरे वाटत नाही 
आईच्या प्रेमाचा बापाच्या आशीर्वादाचा 
भावा बहिणीच्या आधाराचा 
प्रियेच्या प्रीतीचा 
स्पर्श सरला की आटला की 
जीवनाचे झाड वठू लागते 
एकटेपणात गळू लागते 

पण हे स्पर्श विकत घेता येत नाही 
बळेच मागता येत नाही 
ते आपसूक यावे लागतात 
घरटे बांधणाऱ्या पाखरासारखे
ते घरटे ते पाखरू ती पिलेही 
मग झाडाची होतात 
त्यांच्या स्पर्शात त्या सहवासात 
झाड गाणे गाते झाड झाड होते  
जीवन जगते 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

तुझे चित्र

तुझे चित्र 
***

तुझे चित्र 
पाहते मला  
असेच सदैव 
वाटते मला 

अन मग
त्या चित्राला 
भाव माझ्या 
मनातला 

कळला असे 
वाटते मला 
तुझा स्पर्श 
होतो जीवाला 

तुझे जीणे 
माझे गाणे 
दोन क्षणाचे 
येणे जाणे 

या जन्माच्या 
पलीकडले 
काही कळते 
न कळलेले 

किती कसे 
अन कुठवर
या प्रश्नाला 
नाही उत्तर 

ते पाहणे 
नि विरघळणे 
पुन्हा नव्याने 
घडते जगणे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

वादळ

वादळ
******
कुठल्या जगी का उठते वादळ 
अवघाच खेळ अज्ञाताचा ॥

कोण कुणा भेटे कुठल्या ओढीने
पापण्यात गाणे साचलेले ॥

ओठी येती शब्द अर्थ नसलेले 
पाण्यात पडले  जैसे पान ॥

जरी म्हणावे या व्यर्थ अपघात 
परि वाटतात ठरवले ॥

कुठल्या जन्माचे प्रारब्ध साचले 
देणे वा उरले कुणासाठी ॥

विक्रांत चकित पाहतो जगणे
होऊन जगणे वाहतो मुक्त ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

अन्न

अन्न
*****
अन्न वासनांचे असते रे मूळ 
जैसे ज्याचे बळ धाव तैसी ॥१

सांगे भगवंत तया गीतेमाझी 
पाहिली तैसीची वृत्ती जगी ॥२

व्यापिले मनाला राजस तमाने 
घेता आवडीने तैसे अन्न  ॥३

सात्वीके प्रदीर्घे मन झाले शांत 
जैसे पाणी संथ जलाशयी ॥४

पाहिले मनाने घडणे पडणे 
घडू दे जगणे आकलनी ॥५

विक्रांता जिभेला जितने कठीण 
जगणे त्रिगुण म्हणुनिया ॥६

परी दत्तात्रेय करीतसे खेळ 
आणीतसे वेळ योग्य तैसी ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०२२

नच सोडी


नच सोडी
*********
लिहितो कवणे बळेच रेटून 
भाव भक्तीविन दत्ता जरी ॥१

जगी मिरवतो ज्ञान पाजळतो 
असून रिक्त तो आत जरी ॥२

जळतो कामने क्रोधाने भरतो 
गुणी म्हणवतो जगात या ॥३

वैराग्याची बहु गातसे महती
विकार दिसती लाख  उरी॥४

नकोस देऊस असली भक्ती 
त्याहून बरी ती माया तुझी ॥५

 दत्ता त्याग तू भले विक्रांतला
हा श्वान धन्याला नच सोडी॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...