रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

पुटी


पुटी
****
दत्त म्हणता म्हणता
दत्त स्थिरावतो चित्ता
 सार्‍या हरवती वृत्ती
 त्याची कणोकणी सत्ता 

अहं दत्ताचे स्फुरण  
ब्रह्म दत्त नाम दोन
म्हणा नभ वा गगन 
राही अवघ्या व्यापून

 दत्त जरी निराकार
घेई भक्तीने आकार
मन बुद्धीच्या अतीत 
 घेई पूजा उपचार 

ऐसा दत्त जाणवा रे 
सदा स्फुरणी ठेवावा 
असे सदोदित जिथे 
त्या त्या क्षणात पहावा

कोण पाहतो कोणाला 
प्रश्न थोरला उरतो
कोहं सोहं जळुनिया 
फक्त तोच तो राहतो 

काय सांगावे शब्दात 
वाचा वर्णाविन उगी 
नाम रूपाची ही सृष्टी
नाही विक्रांता रे जगी 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

हाक


हाक
*****

माझी थकलेली हाक तव कानी 
पडेना अजुनि काय दत्ता?॥१

जळू गेले प्राण सरे माझी शक्ती 
रिक्ततेची भीती फक्त पोटी ॥२

हरवलो रानी धावे अनवाणी 
तुटल्या वाटांनी निशी दिन॥३

 बापा अवधूता किती कष्ट देशी 
परीक्षा पाहसी दिनाची या ॥४

मूर्ख शिरोमणी उद्दाम अडाणी 
विक्रांता जाणुनि क्षमा करी॥५

 नको धनमान नको यशोगान
दाखवी चरण एक वेळ ॥६

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२

नसणे

नसणे
******

विक्रांत जगला अथवा की मेला 
दत्ताचा जाहला आहे आता॥१
कुणी ठेवो नावो कुणी गुण गावो 
चित्ता नाही ठावो कशाचाही॥२
नको धनमान नको यशोगान
दत्ताचे चिंतन पुरे मज ॥३
सरले कारण आता जगण्याचे
नाही मरण्याचे काम उरे ॥४
आहे तिथे आहे जाय तिथे जाय 
आणि सांगू काय मात इथे ॥५
घडले न काही घडणे न काही 
नसणे मी पाही माझे आता ॥ ६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘
 


गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

दरवळ

दरवळ
*******
तू एक दरवळ 
होऊन सभोवत 
असते वावरत 

आणि मी माझे 
आभाळ सावरत 
असतो त्यात 

मन ज्या म्हणती 
तेही नसते 
नच सापडते

तुझे पणाचे 
कोंदण भोवती 
दिशा उजळती 

तुझी ओळख 
मनात मुरते 
अन गाणे होते

कधी न सरावा 
आषाढ वाटतो 
तो घन मी होतो 

तुझे असणे 
पुरते मजला
या जगण्याला 

आणि बहाणे 
सार्‍याच सुखाचे
होतात साचे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

शिकारी



शिकारी
********
तुटलेल्या धनुष्याचा 
नेम सदैव चुकतो 
उलटून बाण पुन्हा 
मारणार्‍या लागतो ॥
लक्ष्य समोर दिसता 
हात  शिवशिवतात 
शिकाऱ्याचे चित्त मग 
साधना विसरतात ॥
शिकार मुळी नसते 
कधीसुद्धा ती शिकार 
मनाचा या मारेकरी
कुणा कसा कळणार ॥
कधी काम क्रोध मोह 
कधी मद व मत्सर 
अचानक येऊनिया 
नाचतात उरावर ॥
शिकारी होता शिकार 
उर्मी साऱ्या मिटतात 
चौहाटी पडते प्रेत 
गिधाडे विदारतात ॥
तुटताच धनुष्य ते 
म्हणुनि जाळून टाक 
शिवशिवताच हात 
दत्ताची करुणा भाक॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

ठरव तू


ठरव तू
*******

आशा निराशेचे सोडून वाहणे
तुझ्या दारी येणे केले देवा ॥१

आहे नाही भक्ती तूच सारे जाणे 
आम्ही तो पडणे तुझ्या दारी ॥२

सकाम निष्काम घडे आंदोलने 
तुझं जे करणे करी देवा ॥३

विक्रांता शोधणे हाती गवसले 
पुढचे पुढले ठरव तू  ॥४

तुझ्या चिंतनात किती सुख असे 
मन होय पिसे आनंदाने ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

नेई मज


नेई मज
******

दत्ताच्या ही आधी होता जिथे दत्त 
नेई मज तिथं गुरुनाथा ॥१

निर्गुणा नव्हता फुटला अंकुर 
आकारा आकार उमटला ॥२

कारणा कारण कळल्या वाचून 
असे अकारण सारे जिथे ॥३

तया त्या शून्याचा स्फोट होण्याआधी 
कोण कुठे होती कळो मज॥४

असेल धिंवसा मनी हा रे फुका 
जाणणे आणिका खेळ वृथा॥५

विक्रांत तटस्थ उघडून डोळा 
पोहचणे तळा घडेची ना ॥६


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...