मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

दरबार


दरबार
******

भरला होता दरबार बसले होते सरदार 
सत्तेचा आवाज उंच होत होता धारधार 

कधी माणूस तर कधी खुर्ची बोलत होती 
दरबारी सारे जुने गप्प गुमान ऐकत होती 

दरबार्‍यांच्या हाती चाव्या गरगर फिरणाऱ्या 
कोटी कोटी उड्डानाच्या उंच उड्या मारणाऱ्या

सरदाराही माहीत होते दरबारीही जाणत होते  तरीही मान हलवीत जी जी हुजूर म्हणत होते 

सरदाराची मोठी चावी दरबार्‍यांची छोट्या चाव्या काही वेडे पेर त्यात त्यांनी फेकून दिल्या चाव्या

मग त्या आवाज नव्हता वा ऐकला जात नव्हता कानी खणखणाट मोठा कुठे वाहत जात होता

विक्रांत प्यादे एक होऊन खेळ सारा पहात होता अजब दुनिया तुझी दत्ता किती असे म्हणत होता

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

सायरस मिस्त्री च्या निमित्ताने

सायरस मिस्त्री च्या निमित्ताने 
***********************
सुखात सजले क्षणात सरले 
जीवन भिजले वैभवात ॥१
असून भोवती सुख ते अपार 
गेला भोगणार एकाक्षणी ॥२
स्वप्न तुटले डाव मोडले 
भोग राहिले उरामध्ये॥३
हे तो घडते घडतच असते 
परंतु पाहते कोण इथे ॥४
अन प्रश्ना ज्या उत्तर नसते 
डोके फोडते कोण तिथे ॥५
स्वप्नचि असते ज्याचे जगणे 
त्याचे मरणे क्लेषाधिक ॥६
ठाऊक तुजला ठाऊक मजला 
जवळ ठाकला मुक्काम तो ॥७
घडते स्मरण त्याचे दाटून 
येताच घडून असे काही॥८
या मरणाचा खेळ दावला  
मज निशंक केला दत्तात्रेये ॥९
जग रे विक्रांत वा मर आता 
नुरला गुंता कुठेच काही ॥१०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘..

माझा गणपती महासुखराशी



महासुखराशी
**********
महासुखराशी माझा गणपती
लावण्याची मूर्ती मनोहर ॥१
पाहताच तया हृदयात प्रीती 
ओसंडून येती काठोकाठ॥२

जैसे आकाशात बिंब उगवते 
सृष्टी प्रकाशाते हर्ष भरे॥३
तया परि मन होते उल्हसित 
दंग चैतन्यात अनामिक॥४

तांबूस शेंदरी तनु ती गोजरी
तुंदील साजरी सान गोड॥५
पाश अंकुशादी आयुध हातात 
भग्न एक दात तोही शोभे॥६

वस्त्र भरजरी सर्प कटीवरी
शुर्पकर्णावरी कुंडल ती॥७
दिव्य पितांबर शेला खांद्यावर 
माळा गळाभर सुगंधित ॥८

पाहूनया मूर्ती सुखोर्मी उठती 
डोळे पाझरती आनंदाने ॥९
भाग्यवशे देसी तूच तुझी भक्ती
रुजली विक्रांती कृपा तुझी ॥१०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘..


शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

कविता प्रयोजन


कविता प्रयोजन
************
शब्द म्हणजे कवितेतील 
एक फुल असते 

फुल उमलते 
वेचले जाते
फुलांमध्ये फुल गुंफते 
आणि एक माला सजते 

मालेचे प्रयोजन 
दैवत असते 
प्रेम असते 
आर्तता असते 
समर्पण असते 
व्यक्त होणे असते 

पण ज्याला 
ती माला वाहायची 
ती वेदी 
तो गाभारा 
तिथे 
जेव्हा कोणीच नसते

तेव्हा ती 
फुले वेचली जात नसतात
माला माळली जात नसते 
आणि कविताही 
उमटत नसते


झाड असते फुल असते 
पण वेचणे नसते.
विखुरल्या शब्दांचे 
निरर्थक वाहणे
आणि हरवून जाणे
कुणाला कळतही नसते.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘..

तिला किंवा मला

 

तिला किंवा मला
************

तिला किंवा मला जाणे होते कधी
सुटताच गाठी 
बांधलेल्या

आणि ती जाताच सगळी सजली
स्वप्ने विखुरली  वाऱ्यावर 

नसून जायचे  ये जाणे घडून 
हात सोडवून प्रयासाने 

दुःखाचा आषाढ आलाच दाटून 
आकाश भरून आठवांनी 

चाललो त्यातच चिंब गारठून 
रडलो बसून मातीमध्ये 

तुटण्याचे दुःख पाण्यास देऊन 
उरात घेऊन एक शूल

कोण बांधणारा कोण सोडणारा 
प्रारब्ध पसारा प्रत्येकाचा 

वाहतोय वारा कोसळते पाणी 
जातसे वाहुनी कणकण 

अनंत जीवन अनंत मरण 
पुन्हा येणं जाणं तिला मला

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘..

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

तुपातल्या साखरेस


तुपातल्या साखरेस 

करायाचे असे काय 

विलोपन झाले तरी 
तिची गोडी कुठे जाय 

तैसी देवे देता मिठी 
माझे पण नाही होय 
चाखणाऱ्या कळे फक्त 
देवे केली काय सोय 

भक्ताविन देवा सुख 
भक्तीचे मिळत नाही 
भक्ता विन देवाचे ते 
देवपण उणे पाही

देवभक्त मिसळता 
माधुर्याला सीमा नसे
महासुख याहून रे
आणखी ते काय असे 

डब्यातील साखर ती 
चमच्यात ये बाहेर 
तुपामध्ये पडायला 
असे किती रे अधीर 

दत्त करी पण पिठी 
तिये पार भरडून 
एकत्वा नको कसर
जणू काही रे म्हणून


गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

देव खेळणे नसतो .

देव खेळणे नसतो .
************
कळ दाबता उठतो 
कळ दाबता बसतो 
आशीर्वाद ही देतो
देव खेळणे नसतो॥१

सर्वव्यापी सनातन 
विश्वाचा हरेक कण 
असुनिया निर्गुण 
लीलाधर तो सगुण॥२

देव गाभारी बसावा 
देव हृदयी धरावा 
मुळी नच रे हलावा
प्राणची तो  रे व्हावा॥३

देव स्वतःचं उठावा
भक्तासाठी रे धावावा
 कडकडून भेटावा
द्वैत भेद हा मिटावा॥४

कळ गूढ ती आतली
कुणा क्वचित कळली
खूण  खूणेनी  दिसली 
विद्या विक्रांता फळली॥५

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे

अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...