गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

दत्त भगवंत

दत्त भगवंत
*********

अनादि अनंत 
दत्त भगवंत 
सर्व हृदयात 
वास जरी ॥

शोधून दिसेना 
भजून मिळेना 
सहजी कळेना 
आदेश तो  ॥

व्यापतो जगाला 
व्यापतो कणाला 
हरेक मनाला 
सुखावतो ॥

गोवून रूपात
घालून नामात
बळे त्या विश्वात 
आणियले

जरी का राहतो 
शब्दाच्या अतीत 
तेवतो सतत 
आत्मरुपी ॥

विक्रांत अंतरी 
घालतसे उडी 
पाहे घडी घडी 
रूप त्याचे

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

गिरनार

गिरनार 
*******
तेच शिखर डोळ्यात 
तीच पावुले ह्रदयात
तीच धुनी कणकणात 
जळते आहे॥

तेच आकाश अफाट 
तोच वारा बेफाट
तेच चित्त चाकाट 
स्तंभित आहे॥

तोच गंध चाफ़्याचा 
तोच स्पर्श धुक्याचा 
तोच अश्रु सुखाचा 
ओघळत आहे॥

तोच विक्रांत इथला 
तोच अजून तिथला 
त्याच उभ्या कड्याला
बिलगून आहे ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

चातक


चातक
******

डोळ्यात चातकाचे मी
सजवून स्वप्न वेडे 
आलो सोडवत तेच
अशक्य अप्राप्य कोडे 

सूरवात ना जयाला 
नच अंत ठरलेला 
पुन:पुन्हा वलयात 
जन्म त्याच का पडला 

धुक्यात गडद गर्द 
पदरव कुणाचे हे ?
जे दूर दूर से जाता 
हृदयी कल्लोळ का हे ?

असेच पडती बंध
मज ठाऊक नव्हते 
रुपते खुपते खोल 
मी फक्त ऐकले होते 

तू ये ना बघ एकदा
वांच्छेत जन्म थांबला 
हा पक्षी पथ चुकला 
पंखात सांज दाटला 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

मीपण

मीपण
******
माझ्या मनातील 
मी पण उघडे 
जोडून तुकडे 
उगा वाढे ॥

होतो रे आताच 
जरी का वाटते 
तेव्हा ते नसते 
असणेही॥

घडल्या कृतीत 
नसे करणारा 
येई अवतारा 
नंतर तो ॥

आणिक येताच 
मागील क्षणाला 
म्हणतो आपला 
कर्तेपणी ॥

कृती हीच कर्ता 
असे खरे तर  
म्हणा हवे तर 
नसे कर्ता ॥

परी सरताच
त्याचे भान येते
अन चालू होते
मनोराज्य ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

भक्तीची भाकर

भक्तीची भाकर
************

योग असे लेणे 
सुवर्ण सुंदर 
शोभे देहावर 
सजलेले ॥

नच भरे पोट
निवे तगमग 
लागता ती आग 
अंतरात ॥

तया तीच अट 
राहणे चालत 
वाट अनवट 
भुके पोटी॥

ज्ञान सांगे गोष्टी 
पक्वान्ने अपार 
परी हातावर 
देता कष्ट ॥

काय जमविणे 
कैसे शिजविणे 
नाहीच चुकणे 
मान्य तिथे ॥

भक्तीची भाकर 
मिळे हातावर 
मागता लेकरं
लगेचच ॥

विक्रांत हातात 
तुकडा इवला 
घेऊन चालला 
कौतुकाने


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

आभाळी

वृत्तीच्या आभाळी 
************

वृत्तीच्या आभाळी 
दत्त ओघळला 
गंध मृत्तिकेच्या 
आकाश जाहला ॥

कडाडे मौनात 
खुळी सौदामिनी 
उमटली झणी 
जीवनाची गाणी ॥

गडाडला नाद 
कपारी अंतरी 
कंपणात गिरी 
उभी रोमावळी ॥

बहरली उर्मी 
जाग पानोपानी 
अधीर जीवनी
जाण्या हरवूनी ॥

ये रे बा कृपाळा
वादळ होऊनी
तुटू दे रे  देठ
जाऊ दे वाहूनी ॥

विक्रांत उडाला
सुटला मिटला
पायाशी पडला
दत्ताचिया ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

अनाम्याच्या दारी

अनाम्याच्या दारी 
*************

अनाम्याच्या दारी 
नामाची रांगोळी 
मोतीयांच्या ओळी 
पाणीदार ॥

कुणी रेखी नाम 
राम कृष्ण हरी 
शंकर मुरारी 
कुणी नाथ ॥

स्वामी समर्थ वा
प्रभू गुरुदत्त 
कुणी ते स्मरत 
जगदंब ॥

जया जी आवडी 
ठिपके तो जोडी 
उभारी रूपडी 
शून्यातून ॥

भाव तो फळतो 
भक्त हे जाणतो 
म्हणुनी धरतो 
घट्ट त्यास ॥

अनुसंधानाचे 
गोड हे साधन 
विक्रांत जाणून 
सांभाळतो ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...